खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:16 AM2024-05-10T06:16:51+5:302024-05-10T06:17:38+5:30
शिंदेसेनेचा पलटवार : प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, प्रचाराची पातळी घसरली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारातील टीकेने टोक गाठले आहे. उद्धवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर आपल्या भाषणात 'दीवार' चित्रपटाचा दाखला देताना खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली. त्यावर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? असा सवाल करत प्रतिहल्ला चढवला.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईचे उद्धवसेनेचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्यानंतर उद्धवसेना-शिंदेसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
गुलाबी थंडीत काय केले?
'तुमचा काहीच संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केले? हे जरा तुम्ही लोकांना सांगा. आपल्याला परत खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या, असे सांगणाऱ्या तुम्ही, तेव्हा तुम्ही कुणाला बोलताय याचा जरा विचार करा आणि भान ठेवा,' अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.
दावोसला गेलेच नाही!
'मी कधीच दावोसला गेली नाही! पण मी एक दिवस नक्कीच जाईन. गद्दार सेनेच्या या महिलेने हे सिद्ध केलेय की, त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत.
कुठे कुठे फिरल्या?
खासदारकीसाठी प्रियंका चतुर्वेदी या कुठे कुठे फिरल्या. याचा विचार त्यांनी करावा. मगच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बोलावे, असा टोला कल्याणचे शिंदेसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी लगावला.