मेटे, जानकरांनाही ‘संघशिस्त’ भंगाची नोटीस!
By admin | Published: December 19, 2015 12:30 AM2015-12-19T00:30:49+5:302015-12-19T00:30:49+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री व २० आमदारांना भारतीय जनता पक्षाने
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री व २० आमदारांना भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. विशेष म्हणजे, रासपचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाही तसे पत्र गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सहयोगी पक्षांनाही संघशिस्त सक्तीची आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघातर्फे उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांसाठी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गास सर्वांची उपस्थिती रहण्यासाठी भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी सर्व आमदारांना याची कल्पना दिली होती.
भाजपातर्फे वर्गस्थानावर उपस्थितांची हजेरीही घेण्यात आली. वर्गाच्या वेळी १३९ आमदारांपैकी ११७ जणच उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या २२ जणांमध्ये परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख व आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम यांचादेखील समावेश होता. याची पक्षातर्फे गंभीर दखल घेण्यात आली व या सर्व आमदारांना तंबी देणारे पत्र पाठविण्यात आले. पक्षाने कळवूनदेखील अनुपस्थित राहणे हे पक्षशिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
गैरहजर राहिलेले सदस्य
विजय देशमुख (राज्यमंत्री), अंबरीश आत्राम (राज्यमंत्री),आशिष देशमुख, कृष्णा खोपडे, देवयानी फरांदे, अनिल गोटे, लखन मलिक, समीर मेघे, लक्ष्मण पवार, सुभाष देशमुख, अमल महाडिक, मितेश भांगडिया, विनायक मेटे, सुधीर पारवे, भारती लव्हेकर, राहुल अहेर, प्रभुदास भिलावेकर, संतोष दानवे, योगेश टिळेकर, सुधीर गाडगीळ, रामनाथ मोते, महादेव जानकर.
नोटीस नव्हे तंबी!
भाजपाच्या २२ आमदारांना नोटीस दिली असल्याची चर्चा दिवसभर विधिमंडळात होती. यासंदर्भात संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांना विचारणा केली असता, पक्षशिस्त कायम राहावी व पुढे असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांना उद्देशून असे पत्र काढले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नोटीस ही वैयक्तिकपणे देण्यात येते. भाजपातर्फे आमदारांना नोटीस देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जानकर, मेटेंच्या समावेशाने आश्चर्य
या पत्रामध्ये रासपचे महादेव जानकर व विनायक मेटे यांचे नावदेखील नमूद आहे. हे दोघेही भाजपाचे सदस्य नसून संघाशी यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नाव यात कसे आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. परंतु आम्ही दोघेही विधानपरिषदेत तांत्रिकदृष्ट्या भाजपाच्या ‘कोट्या’त असल्यामुळे आमचे नाव यात टाकण्यात आले आहे, अशी सारवासरव जानकर यांनी केली.