हवामान खात्याने वर्तविला अंदाज पावसाचा, पडले ऊन, हवामान खात्याचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:35 AM2017-09-19T05:35:08+5:302017-09-19T05:36:36+5:30
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले.
मुंबई : सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि पावसाऐवजी दिवसभर पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाची अनुक्रमे १.०, १.४ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९.३, २५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांचा सोमवार कोरडा गेला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता मंगळवारसह बुधवारी पाऊस कोसळेल का? याकडे हवामान खात्यासह मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
>सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यामुळे मुंबईकरांनी जवळ छत्री बाळगली. प्रत्यक्षात पाऊस पडलाच नाही. उलट उन्हाचा कडाका वाढला. त्यामुळे अखेर पावसासाठी जवळ बाळगलेली छत्री मुंबईकरांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी उघडावी लागली.