मुठेला पूर
By admin | Published: August 4, 2016 12:46 AM2016-08-04T00:46:18+5:302016-08-04T00:46:18+5:30
गेल्या चोवीस तासांत खडकवासला धरणसाखळी मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खडकवासला दुसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे.
पुणे : गेल्या चोवीस तासांत खडकवासला धरणसाखळी मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खडकवासला दुसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे. त्यातच पानशेत आणि वरसगाव धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत ४० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील चार ते पाच सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी घुसले. मात्र, पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेकडून सकाळपासूनच या भागातील नागरिकांना घरांमधून बाहेर काढून परिसर रिकामा केल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या वेळी अग्निशमन दलाने ९ सोसायट्यांमधील शंभरहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले.
सकाळपासूनच खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तातडीने महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र, त्यानंतर दुपारी ३ पर्यंत पानशेत, वरसगाव आणि टेमघरसह खडकवासला धरणातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने वेगाने जमा होणारे पाणी धरणात साठत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुपारी १८ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारे तीन वाजता हा विसर्ग २२ हजार क्युसेक्स करण्यात आला. त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली. रात्री हा विसर्ग ४० हजार क्युसेक्स करण्यात आल्यानंतर पाण्याची पातळी आणखी वाढली होती. (प्रतिनिधी)
>दत्तवाडीतही घुसले पाणी
सिंहगड रस्त्याबरोबरच म्हात्रे पुलाच्या परिसरात दत्तवाडी परिसरातील नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी घुसले. या ठिकाणच्या नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हालविण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी रवी पवार यांनी दिली.
या ठिकाणी साथी आसरा, हनुमान नगर, आंबेडकर वस्ती या भागात हे पाणी घुसले. त्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने या भागातील इतर घरेही रिकामी करण्यात आली असून, त्या नागरिकांची व्यवस्था महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
>पुराचा धोका आज वाढणार
पुणे : खडकवासला धरणसाखळी मध्ये सुरू असलेल्या पावसाने या साखळीमधील चारही धरणांंचे पाणी वेगाने वाढत आहे. पानशेत आणि वरसगाव धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने गुरूवारी या धरणातून खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातील विसर्ग गुरूवारी ५० हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वाढविला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्रीपर्यंत पानशेत धरण ८५ टक्के, तर वरसगाव धरण ७२ टक्के भरले होते. मात्र, रात्रीही पाऊस सुरूच असल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याचे नियोजन सुरू करण्यात आले.
विसर्ग वाढविण्यात आल्यास सिंहगड रस्त्यासह पाटील इस्टेट, नवी पेठ, दत्तवाडी, शनिवार पेठेचा काही परिसराला पुराचा धोका असल्याने या परिसरातील बुधवारी रात्री पासूनच महापालिकेच्या अग्निशमदलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. लाईफ बोट, जॅकेट, तसेच इतर आवश्यक साधनसामग्रीसह ही पथके तैनात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
>दिवसभरात ५६़९ मिमी पावसाची नोंद
पुणे : मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे़ पुणे शहरात ३ आॅगस्टअखेर ३४३़२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीपेक्षा २़१ मिमीने अधिक आहे़ बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत शहरात ३९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती़
बुधवारी पहाटेपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली़ दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या़ सकाळी अकराच्या सुमारास काही वेळ पावसाचा जोर अधिक वाढला होता़ त्यानंतरही सायंकाळपर्यंत अधूनमधून जोरदार सरी येत होत्या़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २९ मिमी पाऊस झाला होता़ त्यानंतरही काही सरी येत होत्या़ रात्री ११.३० वाजेपर्यंत ५६़९ मिमी पावसाची नोंद झाली होती़
सिटीझन सायन्स नेटवर्कतर्फे बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंतच्या ३६ तासांत नवी पेठ ७७, कोथरूड ८९, सिंहगड रस्ता १०१, हडपसर ४९, चिंचवड ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शहरातील पाणीकपातीत आणखी वाढ करण्याची वेळ निर्माण झाली होती़ जूनच्या सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला होता़ त्यानंतर जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत झालेल्या जोरदार पावसाने ही सरासरी भरून निघाली होती़ मात्र, जुलैच्या अखेरच्या दिवसांमध्ये पुन्हा पाऊस थांबल्याने १ आॅगस्ट रोजी सकाळपर्यंत २८८़३ मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा ४० मिमीने कमी झाला होता़ या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने ३ आॅगस्टला सकाळपर्यंत शहरातील पावसाने जुलैची सरासरी पार केली़ आतापर्यंत ३४३ मिमी नोंद झाली असून, तो सरासरीपेक्षा २़१ मिमीने जास्त आहे़ पुढील २४ तासांत शहरात थांबून थांबून पावसाच्या सरी येतील, बऱ्याच वेळेस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़
>मंगळवार पेठेतील ३८० कुुटुंबांना हलविले
नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मंगळवार पेठ, जुना बाजार या नदीपात्रालगतच्या झोपडपट्टीमधील ३८० कुटुंबांना महापालिकेच्या बारणे शाळेत हलविण्यात आल्याची माहिती नगरसेवक अजय तायडे यांनी दिली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील कुटुंबांनाही हलविण्याची तयारी प्रशासनाकडून ठेवण्यात आली आहे.
>वडगावशेरीतील
६ कुटुंबांना हलविले
वडगावशेरी येथील नदीकाठच्या ६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने सर्व आत्पकालीन यंत्रणा तयार ठेवली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे सांगण्यात आले.
वारज्यातील २५ कुटुंबे सुरक्षितस्थळी
वारज्यातील नदीकाठच्या २५ कुटुंबीयांची चौधरी शाळेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये क्षेत्रीय कार्यालय व पोलिसांच्या वतीने गस्त घालण्यात येत आहे. बॅटरींची व्यवस्था करण्यात आली आहे.
>पूर आल्यानंतर आली जाग
आत्पकालीन विभागास नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी १३ जून २०१६ रोजी पत्र देऊन नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर योग्य त्या उपाययोजनांची तयारी ठेवण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, तरीही प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. सोसायट्यांमध्ये शिरू लागल्यानंतर आपत्ती निवारण कक्षास जाग आली. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लागणारी कोणतीही सामग्री त्यांच्याकडे नव्हती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नसणे, आत्पकालीन यंत्रणा सज्ज नसणे ही गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागपुरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
>अग्निशमनदल, पोलीस तळ ठोकून
दरम्यान, सकाळपासून या परिसरात सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या सिंहगड पोलीस आणि अग्निशमनदलाने सायंकाळी सहा पर्यंत परिसर रिकामा केला होता. त्यानंतर सात वाजता 40 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर पाण्याची पातळी वाढल्यानंतर आणखी बंदोबस्तात वाढ करण़्यात आली. अग्निशमनदल प्रमुख प्रदिप रणपीसे एक रेस्क्यू व्हँन, एक फायर इंजिन, 30 कर्मचारी, लाईफ बोट एक , दोरखंड, जँकेटसह दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णू जगताप यांच्यासह 10 ते 15 पोलीस अधिकारी आणि 70 कर्मचारी नागरिकां़च्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले होते.