माझ्या कामाची पद्धत ‘एक घाव दोन तुकडे' - अजित पवार
By admin | Published: October 26, 2016 01:09 PM2016-10-26T13:09:02+5:302016-10-26T14:03:10+5:30
होय मी ‘खडूस’ आहे. मी फटाफट निर्णय घेतो. माझ्या कामाची पध्दत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २६ - होय मी ‘खडूस’ आहे. मी पटापट निर्णय घेतो. माझ्या कामाची पद्धत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे. राज्याला खमक्या मुख्यमंत्री हवा, अशी वक्तव्ये करत एकाहून एक प्रश्नांच्या सरबत्तीसमोर कधी फटकळ कधी रोखठोक तर कधी अभ्यासू वृत्तीने सामोरे जात अजित पवार यांनी आपले विविध पैलू उलगडले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनच्या वतीने ‘गप्पा रोखठोक दादांशी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी त्यांची मुलाखत घेतली. तब्बल पावणे दोन तास ही मुलाखत रंगली. मी वेळेवर येणारा माणूस आहे माझ्याबद्दल गैरसमज नको, असे सांगत त्यांनी एक तास उशिरा कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आपण किती वाजता उठतो त्यानुसार कार्यकर्ते भेटायला येतात मी सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या मतदार संघात कार्यरत असतो. पवार साहेबांमुळे ही शिकवण मिळाल्याची कबुली त्यांनी दिली. औद्योगिकीकरणामध्ये आंध्र, गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत़ राज्याला खमक्या नेतृत्वाची गरज असल्याचे पवारांनी निक्षून सांगितले.
माझ्या कामाची पद्धत म्हणजे एक घाव दोन तुकडे अशीच आहे़ जे काम होते ते मी झटापट करतो आणि जे होणार नाही ते नाही असे स्पष्टपणे सांगतो़ चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मी सिंचनाची कामे केली. त्यामुळे सहा टक्के सिंचन क्षेत्र वाढले यावर चितळे आयोगाने देखील शिक्कामोर्तब केला असताना मला भाजप नेत्यांनी बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. राज्य स्वतंत्र झाल्यापासून आजवर ७० हजार कोटींची कामे झाली आणि तेवढाच घोटाळा मी केल्याचा बिनबुडाचा आरोप केला जातो आहे़ या प्रकरणाची चौकशी सुरु आहे़ लवकरच ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ हे चित्र समोर येईल त्यामुळे याबद्दल अधिक बोलणे को असे पवार म्हणाले.
माझ्या काळात राष्ट्रवादीकडे जी खाती होती ती तपासा, निश्चित आमच्या मंत्र्यांच्या कामाचा आलेख चढता राहिला़ त्यामुळे विक्रीकराचे उत्पन्न वाढविणे असो, विविध प्रकल्पांची उंची वाढविणे असो आदी अनेक जनहिताचे निर्णय आम्ही घेतले़ आमच्या सरकारमुळेच राज्यात सध्या सरप्लस वीज झाली आहे.
मी सत्तेत असताना एक टीएमसी पाण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी खर्च व्हायचा आता हाच खर्च ८०० ते हजार कोटींवर आहे. पुण्याच्या मेट्रोला प्रतिदिनी विलंब झाल्यास दोन कोटींचा खर्च वाढत आहे त्यामुळे निर्णय झटापट झाले पाहिजेत, असे ते म्हणाले़ टेल टू हेड पाणी वाटपाचा कायदा आम्ही आणला, देशाने त्याचा अंमल केला असे पवार म्हणाले.
किशोर कुमारांची गाणी अन् मधुबाला ही आवड कशी असे विचारात त्यांनी किशोर कुमाराची ८० व ९० च्या दशकातील गाणी आवडतात असे सांगितले. तुमच्या स्वभावाबद्दल मुलगा पार्थ काय म्हणतो तर बाप खडूस आहे असेच म्हणणार दुसरे काय असे अजित पवार मिश्लिकपणे म्हणाले़
सुरुवातीला रोटरी क्लब ऑफ सोलापूर मिड टाऊनचे गुरुविंदसिंह बोमरा यांनी प्रास्ताविक केले़ रोटरी क्लबचे वर्षा विभुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या़ मान्यवरांनी देखील अजित पवार यांना विविध प्रश्न विचारले. श्वेता हुल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सोलापूर रब्बीचा बागायती झाला ना !
आम्ही उजनी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ११४ टक्के पाणी उजनीमध्ये साठले जाते़ शिरापूर, बार्शी, सीना माढा आदी अनेक प्रकल्पांना आमच्या सरकारने मदत केली म्हणूत तर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने झाले़ रब्बीचा सोलापूर जिल्हा बागायती झाला कसा याचा अभ्यास आपण केला पाहिजे असे अजित पवार यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले़ कोयनेमध्ये ६ टीएमसी पाणी माझ्यामुळे वाढले. अनेक प्रकल्पांची उंची वाढविणे त्यांना निधी देणे ही कामे झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली.