मेट्रो-३ चे कारशेड आरेतच!

By admin | Published: June 30, 2017 01:56 AM2017-06-30T01:56:47+5:302017-06-30T01:56:47+5:30

शिवसेनेचा विरोध डावलून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच उभारण्यात येणार आहे. मेट्रो कारशेडचे काम

Metro-3 carshade is coming! | मेट्रो-३ चे कारशेड आरेतच!

मेट्रो-३ चे कारशेड आरेतच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचा विरोध डावलून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्येच उभारण्यात येणार आहे. मेट्रो कारशेडचे काम दिल्लीमधील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. ३२८ कोटी रुपये खर्च करून हे कारशेड उभारण्यात येणार आहे. कारशेडचे तांत्रिक काम प्रगतिपथावर आहे. मान्सूननंतर अखेर कारशेडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या साधारण अडीच एक वर्षांत या कारशेडचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध गुप्ता (प्रकल्प) यांनी गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मेट्रो-३ च्या कामाचा आढावा घेतला. गुप्ता यांनी सांगितले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारण्यात येणार आहे. दिल्ली येथील सॅम बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मेट्रो-३ च्या कारशेडच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. मेट्रोच्या कारशेडचे तांत्रिक काम प्रगतिपथावर आहे. मान्सूननंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. ३२८ कोटी रुपये खर्च करून येत्या अडीच वर्षांत कारशेड उभारले जाईल. या कारशेडची रचना २५ हेक्टर जागेमध्ये ८ डब्यांच्या ३५ गाड्यांसाठी करण्यात आली आहे.
मेट्रो-३ च्या कामासाठी नरिमन पॉइंट, चर्चगेट, वरळी आणि मरोळ येथील झाडे तोडली जात असतानाच आरेमधील कारशेडसाठी तब्बल ३ हजार १३० झाडे तोडली जाणार आहेत. परिणामी याविरोधात शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला होता. दक्षिण मुंबईतील नागरिकांनीसुद्धा झाडांच्या कत्तलीविरोधात सातत्याने निदर्शने केली आहेत. दरम्यान, कारशेडच्या कामासाठी ज्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे; त्याने यापूर्वी दिल्ली आणि लखनऊ मेट्रोच्या कारशेडचे काम केले आहे. म्हणूनच संबंधिताला मुंबई मेट्रोच्या कारशेडच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले.
कारशेड असेल पर्यावरणपूरक
मेट्रो कारशेडमध्ये पार्किंग, गाड्या धुण्यासाठीची यंत्रणा, प्रशिक्षण सेंटर आणि प्रशासकीय विभागाचा समावेश असेल. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासह सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा आणि सौरऊर्जा प्रकल्पाचा यात समावेश असेल.
विस्थापनावरही शिवसेनेचा विरोध
मेट्रो-३ प्रकल्पामुळे गिरगाव, काळबादेवी आणि दादर येथील नागरिक विस्थापित होतील, असे म्हणत शिवसेनेने या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. मात्र तुर्तास तरी या विरोधाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे.

Web Title: Metro-3 carshade is coming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.