मेट्रो-३ रखडणार!
By admin | Published: July 8, 2017 04:02 AM2017-07-08T04:02:48+5:302017-07-08T04:02:59+5:30
गोरेगावच्या आरे वसाहतीतील ३३ हेक्टर भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावच्या आरे वसाहतीतील ३३ हेक्टर भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिका महासभेत फेटाळून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावला आहे. हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणण्यास भाजपाला तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आठ जागांमधून आरे वसाहतीची निवड करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील परजापूर आणि वेरावली येथील ३३ हेक्टर्स भूखंड निश्चित करण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित विकास आराखड्यात या भूखंडावर कारशेडचे आरक्षण सुचविण्यात आले. मात्र आराखडा रखडल्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागणी करताच या भूखंडाला ना विकास क्षेत्रातून वगळण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली.
आरे कॉलनी हा मोठा हरित पट्टा असल्याने ही जागा कारशेडला देण्यास शिवसेना, मनसेने विरोध केला आहे. त्यामुळे कारशेडसाठी प्रस्तावित भूखंड ना विकास क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव सुधार समितीपाठोपाठ पालिका महासभेतही फेटाळण्यात आला.
शिवसेनेकडून भाजपाला शह
पालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे. ते करण्याचे आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र आरे कॉलनीतील जागा मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी सोडण्यास शिवसेनेचा विरोध आहे. समान संख्याबळ असूनही विरोधकांना हाताशी धरून शिवसेनेने भाजपाला शह देण्यास सुरुवात केली आहे. प्रस्ताव पुन्हा नामंजूर झाल्याने नियमांनुसार आता तीन महिन्यांनंतरच हा विषय प्रशासन पटलावर आणता येईल.