मेट्रो-३ चे कारशेड आरेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 06:11 AM2017-03-03T06:11:42+5:302017-03-03T06:11:42+5:30
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-३ कारशेड आरे कॉलनीतच होईल
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड कलिना येथे उभारण्याच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-३ कारशेड आरे कॉलनीतच होईल, असे म्हटले आहे. आरेमध्ये कारशेड उभारताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि कमीत कमी वृक्ष तोडले जातील, असेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अश्विनी भिडे म्हणाल्या की, मेट्रो-३ प्रकल्पात जेवढी झाडे तोडली जातील त्या मोबदल्यात ४३ हेक्टर जागेत तीन पट झाडे लावली जातील. प्रत्येक स्थानकाच्या मागे १०० झाडे लावण्यात येणार आहेत. प्रकल्पात ३४ इमारती बाधित होणार होत्या. मात्र झालेल्या सर्वेक्षणानुसार अठरा इमारती बाधित होत आहेत. प्रकल्पबाधितांना घरे दिली जाणार असून, भाड्याच्या घराची व्यवस्था केली जात आहे. (प्रतिनिधी)