मेट्रो ऐतिहासिक वारशाच्या मुळावर
By admin | Published: May 1, 2017 03:26 AM2017-05-01T03:26:25+5:302017-05-01T03:26:25+5:30
पुणे शहराच्या मध्यभागातून मेट्रो भूमिगत असली तरी भूमिगत स्थानकांसाठी इमारती पाडाव्या लागणार आहेत. मामलेदार कचेरी
सुषमा नेहरकर-शिंदे / पुणे
पुणे शहराच्या मध्यभागातून मेट्रो भूमिगत असली तरी भूमिगत स्थानकांसाठी इमारती पाडाव्या लागणार आहेत. मामलेदार कचेरी आणि खडकमाळ आळी पोलीस ठाण्याचाही यामध्ये समावेश असून आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची समाधी आणि त्यांच्या शौर्याची साक्ष देणारे पिंपळाचे झाडही धोक्यात येणार आहे.
सन १८३२ मध्ये खडकमाळ येथील मामलेदार कचेरीत उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी इंग्रजांनी त्यांचा मृतदेह येथील पिंपळाच्या झाडावर तीन दिवस लटकवून ठेवला. हेच ‘पिंपळाचे झाड’ आता पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटदरम्यान होणाऱ्या मेट्रा मार्गावरील स्टेशनसाठी अडथळा ठरत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे झाड वाचवायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनीच्या वतीने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग १६.५८ किलोमीटरचा असून, यात ११.५७ किलोमीटर मेट्रो जमिनीवरून (एलिव्हेटेड) आहे. सुमारे सव्वापाच किलोमीटर मेट्रो भुयारी (अंडर ग्राऊंड) असणार आहे.
या सोळा किलोमीटरच्या अंतरामध्ये एकूण १५ स्टेशन असून, ६ स्टेशन भूमिगत असणार आहेत. या मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. त्यानुसार आता प्रत्यक्ष जो मार्ग निश्चित करण्यात आला तेथे जाऊन मेट्रोचे अधिकारी पाहणी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरून किंवा भुयारी मार्ग व स्टेशनसाठी किती जागा लागेल, स्टेशनच्या बाहेर पार्किंगसाठीची जागा आदी बाबत अत्यंत सूक्ष्म सर्व्हे सुरू आहे. नागपूर येथे महामेट्रोच्या वतीने अनेक मोठ्या झाडांचे रिप्लँटिंग करण्यात आले. परंतु या ऐतिहासिक पिंपळाच्या झाडाची वाढ पूर्ण झाली असून, अत्यंत जुने झाले आहे. त्यामुळे रिप्लँटिंग करणेदेखील शक्य नाही.
याबाबत विविध तांत्रिक गोष्टींचा तपास करण्यासाठी महामेट्रोच्या वतीने तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये शक्यतो झाडाला कोणताही धक्का न लावताच हे काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
असा आहे या ‘पिंंपळा’चा इतिहास...
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उत्रोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी नाईक यांना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळकोठडीत त्यांना ठेवण्यात आले. त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजींची सर्व हकिकत लिहून ठेवली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारे पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी वयाच्या ४१व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा मृतदेह कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवला होता.
झाडाचे काय करायचे मोठा प्रश्न...
भूमिगत ६ स्टेशनपैकी एक स्टेशन खडकमाळ येथील मामलेदार कचेरीच्या जागेवर असणार आहे. या स्टेशनचे काम पूर्ण होईपर्यंत किमान तीन ते चार वर्षांसाठी येथील मामलेदार कचेरी, खडकमाळ पोलीस स्टेशनसह सर्व कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे.
स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर ही जागा पुन्हा पूर्ववत करून येथे नव्याने कार्यालयाचे काम करण्यात येणार आहे. येथेच उमाजी नाईक यांची समाधी व हे ऐतिहासिक झाडदेखील आहे. समाधीचे काम नव्याने करता येऊ शकते, परंतु झाडाचे काय करायचे असा मोठा प्रश्न महामेट्रोसमोर आहे.