पुण्याची मेट्रो पळेना
By admin | Published: June 7, 2017 01:20 AM2017-06-07T01:20:02+5:302017-06-07T01:20:02+5:30
खासगी जागाच नव्हे तर शासकीय जागा देण्यासही आस्थापनांनी विरोध केल्याने पुण्याच्या मेट्रोला अडथळे आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी जागाच नव्हे तर शासकीय जागा देण्यासही आस्थापनांनी विरोध केल्याने पुण्याच्या मेट्रोला अडथळे आले आहेत. मेट्रोबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी जनता दरबार घेतले जात आहेत. परंतु, शासकीय कार्यालयाचे ऐकण्यास नागरिक तयार नसल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आंदोलनाची तयारी करत असल्याचेही समजते. यामुळे पुणे मेट्रोला अडथळ्यांचा प्रवास करावा लागणार आहे.
मेट्रोच्या मार्गाची आखणी करताना मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा मिळणार असल्याने भूसंपादनाचा प्रश्न येणार नाही, असे पुणे मेट्रो कॉर्पोरेशनकडून सांगण्यात येत होते. मात्र, या जागांवरील आस्थापनांना विश्वासात घेतले गेले नाही.
सर्वांत मोठा विरोध कृषी महाविद्यालयाकडून होत आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी कृषी महाविद्यालयाच्या सुमारे ३० एकर जागेवर मेट्रो प्रकल्पाचा डेपो उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु ही जागा संपादीत केल्यास कृषी शिक्षणाच्या मॉडेलचा धोका निर्माण होऊ शकतो. केंद्र शासनाच्या नियमानुसार कृषी महाविद्यालयासाठी १२० हेक्टर जमीन आवश्यक असते. सध्या महाविद्यालयाकडे केवळ ९० हेक्टर जमीन शिल्लक राहिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषी महाविद्यालयाची जागा संपादीत करण्यात येऊ नये, अशी मागणी कृषी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.
याशिवाय हाफकिन इन्स्टिट्यूट, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनी, शिवाजीनगर शासकीय धान्य गोदाम यासह अन्य काही जागा मेट्रो स्टेशनसाठी संपादीत करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट येथे मेट्रोसाठी ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ करण्यात येणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करावी लागणार आहे.
यापैकी बहुतेक ठिकाणी जागा देण्यास विरोध होत आहे. सरकारी मालकीची जागा असतानाही ती ज्या आस्थापनांच्या ताब्यात आहे, त्यांचा जागा देण्यास विरोध असल्यामुळे नागपूर मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसते आहे. भूसंपादनालाच इतका वेळ जात असल्याने प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
परवानग्यांना अडचणी : नागपूर मेट्रोने टाकले मागे
नागपूर आणि पुणे मेट्रोला २०१४ मध्ये एकाच दिवशी मान्यता मिळाली. पण त्यानंतर शासनाच्या स्तरावर व राजकीय पातळीवर नागपूर मेट्रो अत्यंत गतीने पुढे गेली. त्यातुलनेत पुणे मेट्रोचे काम अद्यापही संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटपर्यंतचा पहिला मेट्रो मार्ग १६.५८ किमीचा आहे. यात ११.५७ किमी मेट्रो उन्नत मार्गाने (रस्त्यावरून-एलिव्हेटेड) आहे. सुमारे सव्वा पाच किमी मेट्रो मार्ग भुयारी
(अंडर ग्राऊंड) असणार आहे. उन्नत मार्गावर भूसंपादन करावे लागणार आहे.
।आस्थापनांचा विरोध
जून अखेरपर्यंत मेट्रोसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र आस्थापनांचा विरोध डावलून जागा ताब्यात घेणे सरकारलाही अवघड जाण्याची चिन्हे आहेत.