मेट्रोच्या मार्गिकांना मंजुरी
By admin | Published: October 26, 2016 04:29 AM2016-10-26T04:29:48+5:302016-10-26T04:29:48+5:30
मुंबई मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो मार्ग टप्पा २ ब डीएन नगर-मंडाळे व मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकांना मान्यता देणारा
मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो मार्ग टप्पा २ ब डीएन नगर-मंडाळे व मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मार्गिकांना मान्यता देणारा आदेश नगरविकास विभागाने काढला. त्या अंतर्गत एकूण ११८ किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे.
हा मार्ग उन्नत स्वरुपाचा असेल. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांची एमएमआरडीएने नियुक्ती केली आहे. मेट्रो मार्ग २ दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गांतर्गत टप्पा क्रमांक २ ब मध्ये डी.एन.नगर-मंडाळे दरम्यानच्या कामांची एकूण किंमत १० हजार ९८६ कोटी रु.इतकी असेल. मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुुलुंड-ठाणे-कासारवडवली या प्रकल्पाची किंमत १४ हजार ५४९ कोटी रु.इतकी असेल.
मेट्रो मार्ग ४ साठी केंद्रांच्या निधी उपलब्धतेची वाट न पाहता एमएमआरडीएचा निधी वापरून त्याची उभारणी करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मेट्रो मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग ४ हे २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. या प्रकल्पांसाठीच्या निधीची उभारणी वित्तीय संस्थांमार्फत करण्याची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएची असेल. ती राज्य शासनाची असणार नाही. कर्ज हे एमएमआरडीए घेणार असले तरी आवश्यकता भासल्यास राज्य शासन त्या कर्जाला हमी देईल. मेट्रो मार्ग २ ब या ठिकाणी प्रस्तावित भाडे हे अंतरानुसार १० रुपये ते ८० रुपये इतके असेल. तीन किमीपर्यंतचे भाडे १० रुपये राहील. मेट्रो धावू लागण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार हे भाडे निर्धाण समितीला असतील. (विशेष प्रतिनिधी)