मुंबईकरांसाठी मेट्रो धावली रे..
By admin | Published: June 8, 2014 11:11 AM2014-06-08T11:11:15+5:302014-06-08T17:39:00+5:30
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणा-या मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८ - मुंबईकरांचा प्रवास सुखकर व वेगवान करणा-या मेट्रो रेल्वेचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुपारी एक वाजल्या पासून मेट्रो सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मेट्रोमुळे घाटकोपर ते अंधेरी हा १२ किलोमीटरचा प्रवास अवघ्या २१ मिनीटात पूर्ण होणार आहे.
भीषण वाहतूक कोंडीमुळे घाटकोपर ते अंधेरी हे १२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठीतब्बल एक ते दीड तास वाया जात होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी एमएमआरडीएने रिलायन्सच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे सुरु केली आहे. रविवारी सकाळी बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात ट्रॅकवरुन धावली. सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्सोवा स्थानकाहून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोटरमनच्या डब्यातून मेट्रोचा प्रवास अनुभवला. प्रवासानंतर घाटकोपर स्थानकावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. 'प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावर मेट्रोसाठी बांधकाम करणे हे एक आव्हानच होते. मात्र अशा असंख्य तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आज पूर्ण झाला. मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार किरीट सोमेय्या, गोपाळ शेट्टी आदी मान्यवरांनीही मेट्रोतून प्रवास केला.
तिकीटाचा वाद सोडवणार
रिलायन्स, एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचा प्रकल्प वापरा, बांधा व वापरा तत्त्वावर बांधण्यात आला होता. मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाल्यावर मेट्रोच्या तिकीटाचे दर ९, ११ व १३ रुपये असे ठरवण्यात आले होते. मात्र रिलायन्सने प्रकल्प खर्चात वाढ झाल्याने हे दर थेट १०,२०,३० आणि ४० रुपयांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोचा प्रवास महाग झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांना या सेवेचा फायदा होणार नाही हे स्पष्ट होते. याविरोधात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तिकीटाच्या दराविषयी पत्रकार परिषदेत विचारणा केली असता मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, तिकीटदराविषयी करार करताना मेट्रो अॅक्ट अस्तित्वात नव्हता. मात्र आता या कलमानुसार तिकीट दर असतील. यासाठी रिलायन्ससोबत चर्चा सुरु आहे. तसेच मुंबई मेट्रोला हा कलम लागू करावा की नाही हा वाद आता न्यायालयात गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रोचा दुसरा व तिसरा टप्पा पाच वर्षांत पूर्ण करु
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याल सुमारे आठ वर्षाचा कालावधी लागल्याने मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली होती. रविवारी मेट्रोतून प्रवास करणारे भाजप खासदार किरीट सोमेय्या म्हणाले, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला ऐवढी वर्ष लागली. पण आता केंद्रात मोदी सरकार असल्याने मेट्रोचा दुसरा व तिसरा टप्पा अवघ्या पाच वर्षात मार्गी लावू असे आश्वासन सोमेय्या यांनी दिले.
सुनील खाडे ठरले पहिले प्रवासी
मुंबईतील काँक्रीटच्या जंगलातून धावणा-या, मुंबईतील गगनचुंबी इमारतीचे दर्शन घडवणा-या मेट्रो रेल्वेविषयी मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता आहे. गारेगार व सुरक्षित प्रवास घडवणा-या या मेट्रोतून प्रवास करण्यासाठी रविवारी पहाटेपासून मुंबईकरांनी मेट्रो स्थानकांच्या दिशेने धाव घेतली होती. मेट्रोचे पहिले प्रवासी होण्याचा मान पटकावला आहे तो नालासोपारा येथे राहणा-या सुनील खाडे यांनी. खाडे हे चकाला येथे कामाला आहे. वाहतूक कोडींमुळे मला ब-याचदा अंधेरीहून चकाल्यापर्यंत पायी जावे लागत होते. आता मात्र मी मेट्रोतून प्रवास करणार असून यामुळे माझा वेळ वाचेल असे खाडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे खाडे हे मोनोमधून प्रवास करणारे पहिले प्रवासी होते.