पालिकेच्या उड्डाणपुलांना मेट्रोचा रेड सिग्नल
By admin | Published: May 10, 2015 03:34 AM2015-05-10T03:34:50+5:302015-05-10T03:34:50+5:30
पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या जागेवरच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वेची स्थानके बांधणार आहे़
मुंबई : पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपुलांच्या जागेवरच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो रेल्वेची स्थानके बांधणार आहे़ त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित पाच उड्डाणपुलांचा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे़
प्रस्तावित उड्डाणपुलांची माहिती गेल्या आठवड्यात एमएमआरडीएला कळवत त्यावर पालिकेने टिप्पणी मागविली होती़ परंतु मेट्रो मार्गासाठी चारकोप ते दहिसरदरम्यान स्थानके बांधण्याचे स्पष्ट करत एमएमआरडीएने पालिकेला धक्काच दिला आहे़ उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे स्थानकांची जागा एकच असल्याने आपल्या प्रकल्पावर पुनर्विचार करण्याची वेळ पालिकेवर आली आहे़
या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून ३२८ कोटी रुपये खर्चाचा अंदाज तयार करण्यात आला़ गोरेगाव, मालाड येथील बांगूर नगर आणि मीठ चौकी येथील वाहतूक कोंडी या उड्डाणपुलांमुळे फुटेल, असा पालिकेचा दावा आहे़ परंतु मेट्रो रेल्वेसाठी या जागा सोडणे भाग असल्याने उड्डाणपुलांचा प्रस्तावित प्रकल्प गुंडाळावा लागणार असल्याची नाराजी पूल खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली़ (प्रतिनिधी)