मेट्रो-३ ने गाठता येणार एसटी स्थानक
By admin | Published: January 20, 2017 05:06 AM2017-01-20T05:06:52+5:302017-01-20T05:06:52+5:30
मुंबईत होणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाची जोडणी रेल्वेबरोबरच एसटीलाही देण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईत होणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाची जोडणी रेल्वेबरोबरच एसटीलाही देण्यात येणार आहे. मेट्रो-३ च्या भुयारी मार्गासाठी लागणारी मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयाची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मेट्रोच्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाच्या जागेतून भुयारी मार्गाद्वारे एसटी प्रवाशांना मेट्रो स्थानक गाठता येईल. त्यामुळे एसटीतून मुंबई सेंट्रल येथे येताच प्रवाशांना त्वरित मेट्रो-३ ची सेवा उपलब्ध होईल.
एसटीचे मुंबई सेंट्रल आगार व स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकातून दिवसाला ६२६ बस फेऱ्या सुटतात आणि दररोज दहा हजार प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. बाहेरगावाहून एसटीने मुंबई सेंट्रल स्थानकात येताच मुंबईत विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी रेल्वे स्थानक, बस, टॅक्सीचा आधार घेतात. हीच स्थिती मुंबईच्या विविध भागांतून एसटी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांबाबतही होते. त्यातच मुंबईतील प्रचंड वाहतूककोंडीमुळे एसटीच्या मुंबई सेंट्रल स्थानकात वेळेत पोहोचू की नाही, असा प्रश्न पडतो. यातून एसटी प्रवाशांची मेट्रो-३ मुळे सुटका होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो-३ प्रकल्प होत असून मुंबई सेंट्रल येथेही त्याचे स्थानक असेल. मुंबई सेंट्रल येथे होणारे स्थानक हे भूमिगत होईल. हे स्थानक बनवतानाच त्याची जोडणी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला देतानाच एसटीच्या स्थानकालाही जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.
एसटीच्या मुख्यालयातील आवारातच भुयारी मार्ग बनवला जाणार असून त्यातून मेट्रो स्थानक गाठता येईल. या भुयारी मार्गासाठी लागणाऱ्या जागेची पूर्तता करण्यात आली असून एसटीकडून २४६ चौरस मीटर जागा उपलब्ध करण्यात येईल. ही जागा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडूनच आदेश देण्यात आले आहेत. हा भुयारी मार्ग एसटी प्रवाशांना उपलब्ध होतानाच त्यातून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, मराठा मंदिर, लॅमिंग्टन रोडच्या दिशेनेही जाता येईल. एसटीच्या हद्दीत प्रकल्प बनताच मुंबई सेंट्रल आगाराला वेगळे महत्त्व प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असणाऱ्या वाहन पार्किंग परिसरातून भुयारी मार्ग बनेल. त्यामुळे एसटी आगार व स्थानकात उतरताच प्रवाशांना मेट्रोने मुंबईतील अन्य ठिकाणी जाता येईल.
।मेट्रो-३ साठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयातील काही जागा उपलब्ध झालेली आहे. तेथे भुयारी मार्ग बनेल आणि येथून एसटी प्रवाशांसाठी एन्ट्री-एक्झिट ठेवली जाईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो