मेट्रो स्थानक पुणे रेल्वे स्थानकाला जोडणार
By Admin | Published: August 23, 2016 01:08 AM2016-08-23T01:08:21+5:302016-08-23T01:08:21+5:30
नियोजित मेट्रो स्थानक व पुणे रेल्वे स्थानक परस्परांना जोडण्याचा निर्णय झाला आहे
पुणे : नियोजित मेट्रो स्थानक व पुणे रेल्वे स्थानक परस्परांना जोडण्याचा निर्णय झाला आहे. वनाज-रामवाडी मेट्रोमार्ग उभारणीच्या आराखड्याला त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत अंतिम मंजुरी हाच एकमेव अडथळा आता पुण्यासाठीच्या या महत्त्वाच्या प्रकल्पात शिल्लक राहिला आहे.
पुणे स्थानकारजवळ रेल्वे मंत्रालयाची जुनी ऐतिहासिक इमारत आहे. तसेच तेथे ग्रंथालयही आहे. या दोन्ही वास्तू मेट्रोच्या मार्गात येत होत्या. त्याचप्रमाणे पुढे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचा विषय आला तर त्याला मेट्रो स्थानकामुळे अडचण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांच्याकडून मेट्रोच्या या मार्गाला संमती दिली जात नव्हती. खासदार अनिल शिरोळे यांनी याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यामुळे रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वेचे अधिकारी, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनचे अधिकारी (डीएमआरसी) व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्यात चर्चा होऊन मेट्रोच्या आराखड्यात काही बदल करण्यात आले. या बदलानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली. या बदलानुसार आता नियोजित मेट्रोचे स्थानक व रेल्वेचे जुने स्थानक एकात्मिक असेल. त्यासाठीचा खर्च तसेच मेट्रो स्थानकामुळे रेल्वेच्या ज्या इमारतींची हानी होईल त्याची उभारणी पालिकेने करावी, या अटीवर रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ जमिनीपासून साधारण १५ मीटर उंचीवर मेट्रोचे नियोजित स्थानक असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
>मेट्रोच्या मार्गातील बहुसंख्य अडथळे आता दूर झाले आहेत. पीआयपीबीची मान्यताही बैठकीनंतर लगेचच मिळेल. मेट्रो व जायका हे नदीसुधार प्रकल्प या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांच्या भूमिपूजनासाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.