‘मेट्रो’ ट्रॅकवर!
By admin | Published: August 14, 2014 01:26 AM2014-08-14T01:26:05+5:302014-08-14T01:26:05+5:30
उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाने आणखी एक टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे बुधवारी झालेल्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)च्या बैठकीत या नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे
दिल्लीत पीआयबीच्या बैठकीत सादरीकरण : ८,६८० कोटी रुपयांचा प्रकल्प
नागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाने आणखी एक टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे बुधवारी झालेल्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)च्या बैठकीत या नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी या प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण केले. दुरुस्त्या व सुधारणानंतर ८ हजार ६८० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे ‘नागपूर मेट्रो’ ट्रॅकवर आला आहे.
पीआयबीच्या बैठकीला केंद्रीय अर्थ व लेखा सचिव, केंद्रीय नगरविकास मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव, केंद्रीय नियोजन आयोगाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्यासह या प्रकल्पातील काही अभियंते उपस्थित होते. यावेळी सभापती प्रवीण दराडे यांनी केंद्रीय अर्थ व लेखा सचिवांसमक्ष या प्रकल्पाचे सादरीकरण केले. सादरीकरणात उपस्थित अधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. दराडे यांनी त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. ३८.२१ किलोमीटरचा हा प्रकल्प पुढच्या पाच वर्षांत पूर्ण होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ आॅगस्ट रोजी नागपुरात मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंडळातही लवकरच मेट्रो रेल्वेला हिरवी झेंडी मिळण्याची चिन्हे आहेत.
सादरीकरणानंतर प्रवीण दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मिहान ते कामठी रोड आणि प्रजापतीनगर ते लोकमान्य टिळक या दोन मार्गावर मेट्रो धावेल.
नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. पुढील आठवड्यात भूमिपूजन होण्याची आशा असून, अद्याप तशी अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)