मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
By Admin | Published: June 7, 2014 08:15 PM2014-06-07T20:15:17+5:302014-06-08T02:09:23+5:30
उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे.
मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेत
मुंबई : घाटकोपरहून साकिनाका, चकला, मरोळ, अंधेरी किंवा एअरपोर्ट हा पोटात गोळा आणणारा, वाहतुक कोंडीत थकवणारा प्रवास चुटकीसरशी, अत्यंत आरामात पूर्ण करून देणारी मेट्रो उद्यापासून लाखो चाकरमान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे. असल्फा, चकाला, साकिनाका, एअरपोर्ट मार्ग, मरोह येथील वाहतूककोंडी भेदण्यात मुंबईकरांचे रोजचे तीन तास फुकट जात होते. त्यामुळेच मेट्रो सुरू होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे लाखो चाकरमानी सुखावले आहेत. या प्रत्येकाला मेट्रो प्रवासाची उत्सुकता आहे. इतकी की इतकी की हा महत्वाकांक्षी प्रकल्प तब्बल चार वर्षांच्या विलंबाने प्रत्यक्षात उतरला ही बाब त्यांच्या विस्मृतीत शिल्लक नाही.
मेट्रो हा शहरातील प्रवासासाठीचा सहावा सार्वजनिक पर्याय आहे. लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि मोनो यानंतर आता मेट्रोही मुंबईतल्या सार्वजनिक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकेल. उद्या(८ जून) सकाळी साडेदहा वाजता उद्घाटनानंतर दुपारी एक वाजल्यापासून मेट्रो अधिकृतरित्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. विशेष बाब म्हणजे सुरूवातीचा एक महिना फक्त दहा रूपयांमध्ये मेट्रोतून प्रवास करता येईल.
केंद्रीय रेल्वे बोर्डाने हिरवा कंदिल दिल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो कधी धावणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. शिवाय मेट्रो सुरु करण्यासह मेट्रोच्या तिकिट दराहून राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरु झाली होती. मात्र शनिवारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने या वादावर पडदा टाकत उद्यापासून हा प्रकल्प सुरू करणार अशी घोषणा केली आणि ती वार्यासारखी शहरात पसरली. या घोषणेमुळे घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावरून प्रवास करणार्या लाखो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि याआधीचा प्रवास किती कंटाळवाणा होता, किती वेळ लागायचा, रिक्षा-टॅक्सीसाठी किती पैसा ओतावा लागत होता या चर्चांना उत आला.
इन्फोबॉक्स, पॉईंटर्स
पहाटे ५.३० ते रात्री १२ या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहिल. दररोज १६ मेट्रो ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावतील.
प्रत्येक मेट्रोला वातानुकुलित चार कोच असतील. एकूण १५०० प्रवासी वाहून नेऊ शकेल.
विशेष म्हणजे पहिले ३० दिवस मुंबईकरांना मेट्रोतून अवघ्या दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे.