‘मेट्रो’ला हवी ‘आरे’त आणखी जागा, १२ हजार चौ.मी. जागेची ‘आरे’कडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:19 AM2018-03-12T05:19:44+5:302018-03-12T05:19:44+5:30

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे.

'Metro' wants more space in Aarey, 12,000 sqm Aare's demand for the land | ‘मेट्रो’ला हवी ‘आरे’त आणखी जागा, १२ हजार चौ.मी. जागेची ‘आरे’कडे मागणी

‘मेट्रो’ला हवी ‘आरे’त आणखी जागा, १२ हजार चौ.मी. जागेची ‘आरे’कडे मागणी

Next

मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. आरे कॉलनी येथील मरोळ भागातील सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेपैकी अंडरपासच्या कामासाठी कायमस्वरूपी ५ हजार ३५२ चौरस मीटर व तात्पुरत्या बांधकामासाठी ६ हजार ४७८ चौरस मीटर असे या जागेचे स्वरूप आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे कॉलनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत अधिकच्या जागेसाठीचा प्रस्ताव मांडला आहे. मेट्रो-३ हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने कायमस्वरूपी अंडरपास उभारण्यासाठी व दोन वर्षे तात्पुरत्या बांधकामासाठी जागेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन ताब्यात घेण्याबाबत आक्षेप घेतला जात असतानाच पुन्हा १२ हजार चौरस मीटर जागेची मागणी करण्यात आली आहे. कॉर्पोरेशनने दाखल केलेला प्रस्ताव आता आरे प्रशासनाकडून मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे याबाबत विचारणा केली असता; जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले की, आरेचा कार डेपो भूमिगत नाही, तर जमिनीवर नियोजित आहे. डेपोलगत मरोळ-मरोशी रस्ता असून तो प्रस्तावित रॅम्पला विभागून जातो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी तेथे रेल्वेमार्गाखालून पूल (अंडरपास) बांधण्याचे नियोजित आहे.
परिणामी अंडरपासच्या बांधकामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ५ हजार ३५२ चौरस मीटर इतक्या जागेची कायमस्वरूपी गरज आहे. बांधकामादरम्यान ६ हजार ४७८ चौरस मीटर जागेची तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कॉर्पोरेशन तात्पुरत्या स्वरूपात लागणारी जमीन संबंधित विभागास हस्तांतरित करणार आहे.

जागा बळकावण्याचे काम
आरे कॉलनीमधील जागा बळकावण्याचे काम सुरू आहे. विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी अजून जागेची मागणी केली जात आहे. संपूर्ण आरे कॉलनी ‘ना विकास क्षेत्र’ असताना सरकारकडून आणि एमएमआरसीकडून आरेमध्ये घुसखोरी केली जात आहे. मेट्रो-३ प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आराखडे, नकाशे तयार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता अधिक जागेची मागणी करण्यात येत आहे. मेट्रो-३ भूमिगत केल्यामुळे ४० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येत आहे. जर हाच प्रकल्प उन्नत केला असता तर साधारण ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असता. विकास आराखड्यातील मेट्रो शेडसाठी राखीव जागा बळकावण्यात येत आहे. विनाकारण ४ हजार वृक्षांचा बळी देत वन उद्ध्वस्त केले जात आहे. तज्ज्ञांचे मत फेटाळून ‘विकासकांसाठी’ मार्ग तयार केला जात आहे.
- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

‘आरे’ वाचवण्यासाठी प्रयत्न नाहीच
आरे कॉलनी वाचवण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. आरे कॉलनीमध्ये मेट्रोचे कारशेड बनत असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ‘ना विकास क्षेत्र’ आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामे होता कामा नयेत. मात्र, येथे मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रोमुळे काही वर्षांत आरे कॉलनीच्या परिसरात रहदारी वाढेल. वसाहती वाढतील. वनाची तोड होईल. पर्यावरणाचा समतोल बिघडेल. मुंबईच्या हिरवळीवर घाव घालण्यात येत असून, याबाबत वेळीच पावले उचलण्याची गरज आहे.
- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

Web Title: 'Metro' wants more space in Aarey, 12,000 sqm Aare's demand for the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.