‘समृद्धी महामार्गावरून मेट्रो धावणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:24 AM2019-05-31T03:24:17+5:302019-05-31T06:24:19+5:30
सध्या आठ पदरी महामार्ग तयार होणार आहे. त्यामध्ये १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे.
औरंगाबाद : जागा उपलब्ध नसल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरल्यास नव्याने भूसंपादन करावे लागेल. या महामार्गावर ३७ वर्षे टोलवसुली सुरू राहील असेही त्यांनी सांगितले.
हाय स्पीड रेल्वे (मेट्रो) चा सध्यातरी मुद्दा नाही. मेट्रो महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही.
सध्या आठ पदरी महामार्ग तयार होणार आहे. त्यामध्ये १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी केवळ ४९ मीटर जागा वापरली आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे केले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड म्हणाले.
३७ वर्षे लागणार टोल
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत याचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़ मी. साठी टोल लागणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण खुला होईल. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल.