म्हाडा लाचखोर पाटीलची कारकीर्द काळवंडलेली
By admin | Published: April 21, 2017 03:29 AM2017-04-21T03:29:00+5:302017-04-21T03:29:00+5:30
म्हाडाच्या सदनिकेसाठी पात्र ठरविण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोकण विभागातील उपमुख्याधिकारी संजय काशीनाथ पाटील
जमीर काझी, मुंबई
म्हाडाच्या सदनिकेसाठी पात्र ठरविण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोकण विभागातील उपमुख्याधिकारी संजय काशीनाथ पाटील (वय ५४) याची कारकीर्द वादग्रस्त व काळवंडलेली आहे. ज्या विभागात तो नियुक्तीला आहे, तेथे हात ‘ओला’ केल्याशिवाय फाइल पुढे सरकत नाही, अशी त्याची ख्याती आहे. सात वर्षांपूर्वी त्याला एसीबीकडून अटक झाली होती. मात्र सर्व ‘मॅनेज’ करत पुन्हा हजर होत बढतीही घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पाटीलच्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटमध्ये आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बड्या ‘माशां’वर कधी कारवाई होणार, अशी चर्चा सध्या म्हाडाच्या वर्तुळात रंगली आहे.
कोकण विभागाच्या विरार-बोळिंज येथील घरांच्या सोडतीत विजेती ठरलेली एक तरुणी कागदपत्राच्या छाननीमध्ये अपात्र ठरली. मात्र पाटीलने त्याबाबत पुन्हा प्राधिकरणाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून तिला पात्र करतो, असे सांगून तिच्या पित्याकडे ५० हजारांची मागणी केली. त्याबाबत एसीबीकडे त्यांनी तक्रार दिली. विभागाने सापळा रचून त्याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्याचे कार्यालय व घराची झडती घेण्यात येत आहे. म्हाडाच्या वर्तुळात दिवसभर त्याच्या ‘कार्यपद्धती’ची चर्चा रंगली होती. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजू नागरिकाला हेरायचे, कामाच्या स्वरूपाप्रमाणे त्याच्याकडे थेट पैशांची मागणी करायची, त्यासाठी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतात, असे सांगत रकमेचा आकडा वाढवत असे. रकमेची पूर्तता न केल्यास कोणत्याही परिस्थितीत फाइल पुढे सरकणार नाही, असे तो धमकावत असे. त्यामुळे गरजू नागरिक भीतीपोटी त्याच्या मागणीप्रमाणे पूर्तता करीत असत.
संजय पाटील हा २०१०मध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात (आरआर बोर्ड) मिळकत व्यस्थापक म्हणून कार्यरत होता. त्या वेळी एका रॅकेटमध्ये त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्या पथकाने मध्यरात्री पाटील याच्या घरून त्याला अटक केली. मात्र तपासातून निर्दोष ठरत तो पुन्हा सेवेत रुजू झाला. पदोन्नतीही घेतली होती. आता अटक झाल्याने पुन्हा त्याच्या ‘कार्यपद्धती’ची चर्चा सुरू झाली आहे.