Mhada Exam : परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:30 PM2022-02-04T19:30:18+5:302022-02-04T19:30:44+5:30

प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर मेटल डिव्हाईसद्वारे परीक्षार्थींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mhada Exam Candidates will be examined by metal device | Mhada Exam : परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी

Mhada Exam : परीक्षार्थींची होणार मेटल डिव्हाईसद्वारे तपासणी

Next

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षांना ३१ जानेवारी २०२२ पासून प्रारंभ झाला असून ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सर्व परीक्षार्थींची मेटल डिव्हाईस (Hand Held Metal Device) द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. म्हाडातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील दोन परीक्षा केंद्रांवर काही उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर मेटल डिव्हाईसद्वारे परीक्षार्थींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

परीक्षा प्रक्रियेबाबत माहिती देताना 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी सांगितले की, दि. ३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान झालेल्या परीक्षेदरम्यान दोन परीक्षा केंद्रांवर उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार बसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डमी उमेदवाराकडून पोलिसांनी चीप असलेले एक इलेक्ट्रॉनिक उपकरण हस्तगत केले आहे. म्हाडाची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली जात आहे, असे सांगत सागर म्हणाले की, परीक्षेला आलेल्या सर्व उमेदवारांचे फोटो काढले जातात व खात्री पटल्यानंतरच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो. संपूर्ण परीक्षेच्या दरम्यान प्रत्येक उमेदवार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असतो.

परीक्षेमध्ये म्हाडा व टीसीएस (Tata Consultancy Services) कडून घेण्यात येत असलेल्या दक्षतेमुळे तोतया उमेदवार पकडण्यात आले आहेत. तोतया उमेदवार व ज्या उमेदवारांकरिता ते परीक्षा देत होते, अशा उमेदवारांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दि. ३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान झालेल्या परीक्षेमध्ये संशयास्पद उमेदवारांची अंगझडती घेण्यात येत होती. मात्र, निदर्शनास आलेल्या गैरमार्गाच्या घटना विचारात घेऊन म्हाडा प्रशासनाने उमेदवारांची मेटल डिव्हाईसद्वारे (Hand Held Metal Device) द्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.    

सागर म्हणाले की, गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरिता बोलाविल्यानंतर तसेच निवड झाल्यास रुजू होताना उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरताना सादर केलेला फोटो, परीक्षेला आल्यानंतर परीक्षा केंद्रावर उमेदवारांचा घेतलेला फोटो या सर्व बाबींची खातरजमा करण्यात येईल तसेच परीक्षा देताना उमेदवारांचे करण्यात आलेले सीसीटीव्ही चित्रीकरण देखील तपासण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Web Title: Mhada Exam Candidates will be examined by metal device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.