म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 07:21 AM2024-08-15T07:21:01+5:302024-08-15T07:21:58+5:30

घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार झाला होता उघड

MHADA fake website finally 'locked' cyber police action; A call to caution | म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच म्हाडाच्या बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत ही वेबसाईट आता लॉक केली आहे. या प्रकरणी सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटशी नामसाधर्म्य असणारी mhada.org या नावाने बनावट वेबसाइट सायबर चोरांनी तयार केली होती. याद्वारे काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. बनावट वेबसाइटचे होम पेज व इतर रचना म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटसारखीच दर्शविण्यात आली होती. मात्र, या बनावट वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय देण्यात आला होता. त्याद्वारे काही खरेदीदारांकडून ५० हजार रक्कम ऑनलाइन भरून घेण्यात आली आणि त्यांना बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला होता.

या पार्श्वभूमीवर म्हाडाने घर खरेदीदारांसह सर्वांना या बनावटगिरीबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. अर्जदारांनी कुठल्याही अनधिकृत वेबसाईटवरील लॉटरीत सहभाग घेऊ नये. तेथे कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये, आर्थिक व्यवहार करू नये, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे. घरांच्या विक्रीकरिता कोणत्याही समाजमाध्यमांची त्रयस्थांची, संस्थांची वा इतर मध्यस्थांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनामत रकमेची मागणी केली जात नाही. प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याने म्हाडा कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून पैशांची मागणी केली जात नाही, असेही म्हाडा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी होते अर्ज प्रक्रिया...

  • म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते.
  • प्रोफाइलमध्ये अर्जदार आपली कागदपत्रे सादर करतील.
  • कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते.
  • पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील.
  • अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो.

Web Title: MHADA fake website finally 'locked' cyber police action; A call to caution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.