म्हाडाच्या थकबाकीदार विकासकांची खाती गोठविणार-गृहनिर्माण मंत्री आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:18 AM2020-03-05T05:18:33+5:302020-03-05T05:18:43+5:30
इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रोखणे, बँक खाती गोठविण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
मुंबई : म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये सहभागी झालेल्या विकासकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या विक्रीसाठी देय असलेल्या इमारतींवर टाच आणली जाईल. याशिवाय इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रोखणे, बँक खाती गोठविण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
प्रा. जोगेंद्र कवाडे, नागो गाणार आदींनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले, म्हाडाकडे थकबाकी असलेल्या अनेक विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उरलेल्या विकासकांवर येत्या आठ दिवसांत गुन्हे दाखल होतील. थकबाकीदार विकासकांच्या जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. बँकखाती गोठवणे, त्यांच्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रोखून धरणे अशा उपाययोजनाही हाती घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.
>आठ दिवसांत गुन्हे दाखल करणार
म्हाडाकडे अनेक विकासकांची थकबाकी आहे. अशा विकासकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक थकबाकीदार विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उरलेल्या विकासकांवरदेखील येत्या आठ दिवसांत गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आव्हाड यांनी सांगितले.