म्हाडाची एमएमआर क्षेत्रात एक लाख घरे; शासन दरबारी पाठपुरावा
By admin | Published: November 7, 2015 03:03 AM2015-11-07T03:03:21+5:302015-11-07T03:03:21+5:30
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात एक लाख घरे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआर क्षेत्रातील शासकीय जमिनी
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात एक लाख घरे उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआर क्षेत्रातील शासकीय जमिनी मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून, जमीन ताब्यात आल्यानंतर या क्षेत्रात दोन टप्प्यांमध्ये एक लाख घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. झेंडे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांत म्हाडाच्या कोकण मंडळाने भिवंडी, पनवेल, पेन, वसई आदी भागातील सुमारे ४५0 हेक्टर जमिनीची पाहणी केली आहे. यापैकी काही जमिनी रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधांपासून दूर आहेत, तर काही जमिनीवर गृहप्रकल्प उभारता येऊ शकतात. अशा जमिनी खरेदी करण्यासाठी म्हाडाने शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.
विविध विभागांच्या जमिनीवर असलेली आरक्षणे बदलून त्या ठिकाणी घरे उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत गृहप्रकल्पासाठी म्हाडाकडे जमीन नाही. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून हाऊसिंग स्टॉक घेण्याबाबत म्हाडा आग्रही आहे. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडे जमीन नसल्याने म्हाडाने एमएमआर क्षेत्रात जमीन खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी मालकीची जमीन खरेदी
करून त्यावर गृहप्रकल्प उभारणे परवडणारे नसल्याने म्हाडाने शासकीय जमिनी खरेदी करण्याचा निर्णय
घेतला आहे. (प्रतिनिधी)