८०० घरांसाठी म्हाडाची जुलैमध्ये निघणार लॉटरी
By admin | Published: June 27, 2017 02:24 AM2017-06-27T02:24:52+5:302017-06-27T02:24:52+5:30
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आता लवकरच ८०० घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण आता लवकरच ८०० घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीची प्रक्रिया जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, जुलै महिन्याच्या पंधरावड्यात लॉटरीसाठीची जाहिरात काढण्यात येणार आहे.
म्हाडाकडून दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात घरांची लॉटरी काढली जाते, परंतु या वर्षी घरांचा साठा कमी असल्याने, मे महिन्यात लॉटरी काढण्यात आली नाही. परिणामी, ही कसर भरून काढण्यासाठी प्राधिकरणाकडून जुलैमध्ये ८०० घरांसाठी लॉटरी काढली जाईल. पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड या परिसरांतील घरांसाठी लॉटरी काढली जाणार असून, याबाबतचा अंतिम निर्णय होईल.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक (महारेरा) प्राधिकरणाच्या नियमांना अधीन राहून, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)चा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने, मुंबईत सुरू असलेल्या २३ गृहप्रकल्पांच्या नोंदणीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली असून, त्यापैकी १२ प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. म्हाडातर्फे काढण्यात येणाऱ्या २०१७ च्या सदनिका सोडतीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील सदनिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चारकोप, तुंगा-पवई, सिद्धार्थनगर-गोरेगाव, महावीरनगर-कांदिवली, कन्नमवार नगर-विक्रोळी, गव्हाणपाडा-मुलुंड अशा मुंबईतील एकूण २३ गृहप्रकल्पांची
नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे.