Mhada Lottery: म्हाडाकडून कोकण विभागासाठी बंपर सोडत जाहीर; तब्बल 8205 घरे उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:31 PM2021-08-05T18:31:46+5:302021-08-05T18:43:33+5:30
Mhada Lottery 2021Thane, Konkan Region: यंदा ऑगस्ट २०२१ मध्ये कोकण मंडळाची ८२०५ सदनिकांची संगणकिय सोडत दसऱ्यापूर्वी प्रस्तावित आहे.
Mhada Lottery 2021 म्हाडाचा (mhada) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 8 हजार 205 सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याची घोषणा केली आहे. सोडतीची जाहिरात २३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सोडत काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
(Mhada lottery 2021: 8205 affordable homes in Konkan region, thane, navi mumbai, sindhudurg.)
सोडतीमध्ये समाविष्ठ एकूण सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० %, अल्प उत्पन्न गटासाठी २७ % (म्हणजेच ९७ % अत्यल्प व अल्प गटासाठी) घरे उपलब्ध होतील.अर्जाची किंमत ५६० रुपये (मूळ किंमत ५०० + ६० जी एस टी = रू.५६०/-) असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार रुपये,अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार रुपये,मध्यम उत्पन्न गटासाठी १५ हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये इतकी असेल.
प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा (मासिक)
अत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार रुपये पर्यंत,अल्प उत्पन्न गटासाठी २५ ते ५० हजार रुपये पर्यंत,मध्यम उत्पन्न गटासाठी ५० हजार ते ७५ हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपये पेक्षा जास्त अशी असेल.
संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने परतावा करण्यात येईल.
ठाणे,पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरे
या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्हयातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत.
म्हाडाच्या विभागीय मंडळातर्फे १० हजार घरांची निर्मिती करणार
राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता तसेच पुणे येथील सोडतीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये १० हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी दिली.
राज्यातील जनतेला केंद्रीय योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न
राज्यातील जनतेला जास्तीत जास्त घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने,त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही मंत्री डॉ.आव्हाड यांनी सांगितले.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे व येत्या ३ वर्षात वरळी बीडीडी चाळीचे चित्र बदललेले असेल असा विश्वासही गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते.