म्हाडाची स्वत:च्याच जमिनींसाठी मुंबईसह राज्यभरात शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:44 AM2018-12-25T06:44:16+5:302018-12-25T06:44:52+5:30
मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे.
- अजय परचुरे
मुंबई : मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांसाठी सर्व जण म्हाडाकडे अपेक्षेने पाहतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडा प्राधिकरणाकडे मोकळ्या जमिनीच नसल्याने नवीन घरांची निर्मिती अवघड झाली आहे. यावर तोडगा म्हणून आता म्हाडा मुंबईसह राज्यभर स्वत:च्याच मालकीच्या जमिनींचा शोध घेणार आहे. आउट सोर्सिंगद्वारे मुंबईसह राज्यभरात म्हाडाच्या किती जमिनी आहेत, कुठे आणि किती अतिक्रमणे झाली आहेत, याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी ‘लोकमत’ला दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचा आराखडा तयार करण्याआधी या मार्गावर आपल्या मालकीची
किती जमीन आहे, याची
माहिती निविदा काढून आउट सोर्सिंगद्वारे मिळविली. त्याच धर्तीवर म्हाडा महाराष्टÑभर जमीन शोधमोहीम राबवेल. नवीन वर्षात या कामासाठी निविदा काढण्यात येतील. त्यानंतर कंपनी नियुक्त करून ठरावीक वेळेतच ही शोधमोहीम पूर्ण करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
याआधी म्हाडाकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या. ज्या मोकळ्या होत्या तिथे त्यांनी गृहप्रकल्प उभारले. पण ज्या जमिनींकडे
म्हाडाचे दुर्लक्ष झाले तेथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली.
ती हटविणे म्हाडाला अद्याप
शक्य झालेले नाही.
मुंबईचा
विचार केल्यास गृहप्रकल्प उभारण्यासाठी म्हाडाकडे मुंबईत जमिनीच नाही. एखादी खासगी जमीन विकत घ्यायची तर भरमसाट किंमत मोजावी लागेल; शिवाय अशा महागड्या जमिनींवर उभे राहणारे गृहप्रकल्पही महागडेच असतील. अशी महागडी घरे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरची असतील. त्यामुळे मुंबईत म्हाडाला सध्या तरी पुनर्विकासावरच अवलंबून राहावे लागत आहे. म्हाडाची राज्यातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. तेथेही मोकळ्या जमिनींची वानवाच आहे.
...म्हणूनच आली माहिती गोळा करण्याची वेळ
म्हाडाकडे सध्या किती जमीन आहे, त्यातल्या किती जमिनींवर बांधकाम झाले आहे, किती जमीन शिल्ल्क आहे, किती व कुठल्या जमिनींवर अतिक्रमणे झाली आहेत, याची सविस्तर माहिती म्हाडाकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच आता ही माहिती गोळा करण्याची वेळ म्हाडावर आली आहे.
यावर उपाय म्हणून सामंत यांनी तत्काळ म्हाडा प्राधिकरणाची बैठक बोलावत मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या जमिनींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.