म्हाडा बांधणार १२ हजार ७२४ घरे, मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 05:56 AM2023-04-07T05:56:55+5:302023-04-07T05:57:29+5:30
यंदा म्हाडाच्या १० हजार १८६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या दहा हजार १८६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आता म्हाडाच्यामुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती मंडळांतर्फे येत्या आर्थिक वर्षात एकूण १२ हजार ७२४ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात पाच हजार ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत दोन हजार १५२ घरांची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी ३६६४.१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीसाठी आणखी घरे उपलब्ध होणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
कोकणात साडेपाच हजार घरे
कोकण मंडळांतर्गत ५६१४ घरे बांधली जातील. यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी १० कोटी, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी ३३ कोटी, माजिवडा ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी ३५ कोटी, मीरारोड टर्न की प्रकल्पासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
किती कोटींचा अर्थसंकल्प
- २०२२-२०२३ - ६९३३.८२ कोटी
- २०२३-२०२४ - १०,१८६.७३ कोटी
- २०२३-२०२४च्या अर्थसंकल्पात शून्य तूट
मुंबईतील कोणत्या प्रकल्पासाठी किती तरतूद?
- बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजना- २२८५ कोटी
- कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजना- २१३.२३ कोटी
- कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजना- १०० कोटी
- बॉम्बे डाइंग मिल वडाळा योजना- ३० कोटी
- ॲन्टॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजना- २४ कोटी
- मागाठाणे बोरिवली येथील योजना- ५० कोटी
- खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजना- १८ कोटी
- पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजना- १०० कोटी
- गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्प- ३०० कोटी
- धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा १ ब- ५९ कोटी
- गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प- १० कोटी
- पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकास- १०० कोटी
मंडळ घरे कोटी
पुणे ८६२ ५४०.७०
नागपूर १४१७ ४१७.५५
औरंगाबाद १४९७ २१२.०८
नाशिक ७४९ ७७.३२
अमरावती ४३३ १४६.२४