म्हाडा नोकरभरतीसाठी होणार दोनदा परीक्षा; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 06:11 AM2021-12-12T06:11:04+5:302021-12-12T06:11:22+5:30
गैरप्रकाराला आळा बसणार : जितेंद्र आव्हाड
म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने आता पुन्हा एकदा मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे दिली.
यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता झालेल्या परीक्षेत घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षांमध्येदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्या कानावर आल्या होत्या, परंतु येथे कष्ट आणि ज्ञानाला किंमत आहे, हे विसरून चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे असा प्रकार घडत असेल तर अशांना दम दिला आहे. त्यातूनही यातील एक गोष्ट जरी माहिती पडली तर त्याला माफी नाही, पैसे देऊन पास होतील असे वाटत असेल तर चाळणी लावण्याचे काम केले जाणार आहे.
यासाठी आता जानेवारी महिन्यात दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला आळा घातला जाईल, असा विश्वासही त्यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केला. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. मात्र तुमचे कोणतेही काम मी होऊ देणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी या दलालांना या वेळी दिला.
माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी दलालांना विनंती आहे की हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांचे काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही.
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री