म्हाडाच्या घरबांधणीतून दुर्बल घटक बाद!
By Admin | Published: August 7, 2015 01:13 AM2015-08-07T01:13:41+5:302015-08-07T01:13:41+5:30
स्वस्तातील घर योजनेतून २०१४-१५ या वर्षात अमरावती विभागातील आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गट बाद ठरला आहे. म्हाडाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार
संतोष वानखडे वाशिम
स्वस्तातील घर योजनेतून २०१४-१५ या वर्षात अमरावती विभागातील आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गट बाद ठरला आहे. म्हाडाच्या दप्तरी असलेल्या नोंदीनुसार, सर्वाधिक सदनिका कोकण व मुंबई विभागात झाल्या असून, सर्वांत कमी घरबांधणी पुणे व अमरावती विभागात झाली आहे.
कोकण विभागात म्हाडाकडून सर्वाधिक १९९९ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात ४२६, तर अमरावती विभागाच्या वाट्याला केवळ ४३ सदनिका आल्या आहेत. अमरावती विभागातील प्रकारनिहाय आकडेवारी बघता, आर्थिक दुर्बल
व अल्प उत्पन्न गटात एकही सदनिका बांधली गेली नाही. मध्यम उत्पन्न गटात ४० व उच्च उत्पन्न गटात तीन सदनिका बांधण्यात आल्याची नोंद म्हाडाच्या दप्तरी आहे.
१९७७ साली स्थापनेपासून ते २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंत म्हाडाने राज्यात ४ लाख ४२ हजार ३१८ सदनिकांचे बांधकाम व पुनर्विकास केला आहे. आर्थिक दुर्बल, अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गट अशा चार गटांतील कुटुंबांना म्हाडातर्फे स्वस्तातील घराचा लाभ दिला जातो.