कोकण मंडळाची ९,१४० घरांची लॉटरी महिनाभर लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:16 AM2020-02-12T06:16:17+5:302020-02-12T06:17:11+5:30
लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ९,१४० घरांच्या लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार होती. मात्र, या घरांमध्ये पोलिसांसाठी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के घरे राखीव ठेवावीत, असे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मात्र, या प्रस्तावाला गृहविभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतरच लॉटरी काढण्यात येणार असल्याने, आता या लॉटरीची जाहिरात आणखी महिनाभर लांबणीवर पडेल, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील. या लॉटरीमधील साधारणत: ९०० घरे ही पोलीस आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांना राखीव ठेवण्यात येणार असल्याने, सर्वसामान्यांच्या घरांचा वाटा काहीसा कमी होईल.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथे १००, नवी मुंबई येथे ४०, कल्याणमधील पलावा येथे विकासकांकडून मिळालेली २०
टक्के घरे अशी एकूण २,००० घरे असतील, तर म्हाडाच्या विविध प्रकल्पांतील ६,०००, मागील लॉटरीतील शिल्लक असलेली १,००० अशा एकूण ९,१४० घरांचा समावेश करण्यात आला आहे.
लॉटरीमधील घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असतील, असे म्हाडाच्या कोकण मंडळाने सांगितले.