म्हात्रे हत्येप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा
By admin | Published: February 16, 2017 04:49 AM2017-02-16T04:49:48+5:302017-02-16T04:49:48+5:30
भिवंडी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून काँग्रेसचे सभागृह नेते
भिवंडी : भिवंडी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हत्येप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात म्हात्रे यांच्या चुलतभावासह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अंंजूरफाटा येथील ओसवालवाडीमागे समृद्धी अपार्टमेंटमधील घरात जाताना म्हात्रे यांच्यावर मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास दबा धरून बसलेल्या सात जणांपैकी एकाने अचानक गोळीबार केला. त्यात ते खाली कोसळताच दोघांनी कोयत्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या म्हात्रे यांचा ठाण्यातील रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो बुधवारी सकाळी कालवार या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला. तेथे दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत खासदार कपिल पाटील, भिवंडीचे महापौर तुषार चौधरी व माजी आमदार योगेश पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. अंजूरफाटा येथील त्यांच्या मतदारसंघातील शेकडो स्त्रीपुरुष पाच किलोमीटरचे अंतर चालत कालवार गावात अंत्यसंस्कारासाठी पोहोचले.
मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या गाडीचा चालक प्रदीप मनोहर म्हात्रे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मनोेज म्हात्रे यांचे चुलतभाऊ प्रशांत भास्कर म्हात्रे, महेश पंडित म्हात्रे, मिथुन मोहन म्हात्रे, बंड्या ऊर्फ रणजित बळीराम म्हात्रे, चिरंजीव ऊर्फ मोटू बळीराम म्हात्रे, गणेश गोपीनाथ पाटील व मयूर ऊर्फ कोळी प्रकाश म्हात्रे या सात जणांनी संगनमताने निर्घृण हल्ला केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मनोज यांच्या जागी प्रशांत यांना पालिका निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येपूर्वी प्रभागातील एक वाद सोडवण्याबाबत पोलीस तक्रार करण्यास मनोज पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून परतताच झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू ओढवला. (प्रतिनिधी)