मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:36 AM2024-10-02T06:36:52+5:302024-10-02T06:37:09+5:30
७८ जागांवरील तिढा सोडविण्यावर खल, प्रत्येक विभागातील काही जागांचे वाटप आता शिल्लक असून घटस्थापनेपर्यंत त्या जागांचा तिढाही सोडवण्याचा मविआचा प्रयत्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीच्या सलग दोन दिवस झालेल्या बैठकीत जागावाटपाची चर्चा पुढच्या टप्प्यावर पोहोचली असून वाद असलेल्या काही जागांवर तोडगा निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १२ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मविआत २८८ पैकी २१० जागांचे वाटप आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उरलेल्या ७८ जागांवरील तिढा येत्या काही दिवसांत सोडवण्याचा तीनही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा प्रयत्न आहे.
लोकसभेतही महाविकास आघाडीने महायुतीच्या आधी जागा वाटप करून आघाडी घेतली होती तर महायुतीचे जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत झाले नव्हते. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेलाही महायुतीच्या आधी जागावाटप जाहीर करून आघाडी घेण्याचा मविआचा प्रयत्न आहे. सोमवारच्या बैठकीत विदर्भातील १२ जागांचा तिढा असल्याचे समोर आले होते. विदर्भातील उद्धवसेना लढत असलेल्या पारंपरिक जागांवर काँग्रेसने दावा केला होता तर काँग्रेसची ताकद असलेल्या काही जागांवर उद्धव सेना आणि शरद पवार गटाने दावा केला होता. मंगळवारच्या बैठकीत यातील सहा जागांचा तिढा सुटल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक विभागातील काही जागांचे वाटप आता शिल्लक असून घटस्थापनेपर्यंत त्या जागांचा तिढाही सोडवण्याचा मविआचा प्रयत्न आहे.
मविआत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. प्रत्येक विभागातील राहिलेल्या दोन-चार जागांवर चर्चा सुरू आहे. घटस्थापनेला बहुतांश जागांचे वाटप पूर्ण होईल, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनही पक्ष जागा वाटप जाहीर करतील. दोन तृतीयांश जागांवर आमची आतापर्यंत सहमती झाली आहे.
- जितेंद्र आव्हाड, नेते, शरद पवार गट