एमएचटी-सीईटी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर
By admin | Published: June 3, 2017 09:37 PM2017-06-03T21:37:17+5:302017-06-03T21:37:17+5:30
भियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत स्मित धरमशी रामभिया व विजय जगदीश मुंद्रा या विद्यार्थ्यांनी २०० पैकी १९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश कक्षामार्फत दि. ११ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर केला जाणार होता. मात्र, कक्षाने एक दिवस आधीच शनिवारी सायंकाली पाच वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर केला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन गटात ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रवेश परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ९६३ मुले व ९८ हजार २७६ मुलींनी ‘पीसीएम’ गटात तर १ लाख २२ हजार ३११ मुले व १ लाख १६ हजार ५४ मुलींनी ‘पीसीबी’ गटात परीक्षा दिली.
‘पीसीएम’ गटात स्मित धरमशी रामभिया व विजय जगदीश मुंद्रा हे विद्यार्थी २०० पैकी १९७ गुण मिळवून अव्वल ठरले आहेत. तर ‘पीसीबी’ गटात अमेय प्रसाद माचवे हा विदयार्थी २०० पैकी १९० गुणांसह प्रथम आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये ‘पीसीएम’ गटात हृषीकेश पवार या विद्यार्थ्यांने २०० पैकी १९० गुण तर ‘पीसीबी’ गटात गौरव कचोळे या विद्यार्थ्याने २०० पैकी १८७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या परीक्षेत २३ हजार ७८ विद्यार्थ्यांना ‘पीसीएम’ गटात व १२ हजार ७१२ विद्यार्थ्यांना ‘पीसीबी’ गटात १०० किंवा त्या पेक्षा जास्त गुण आहेत. २८८९ उमेदवारांना ‘पीसीएम’ गटात तर ५७३ उमेदवारांना ‘पीसीबी’ गटात १५० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा कक्षामार्फत देण्यात आली.
संकेतस्थळ हँग, निकाल पाहण्यात अडचण
राज्य परीक्षा कक्षामार्फत सीईटीचा निकाल शनिवारी एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला असला तरी तांत्रिक बिघाडामुळे संकेतस्थळ हँग झाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत निकाल पाहता न आल्याने त्यांची निराशा झाली. निकाल पाहण्यासाठी तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाचवेळी संकेतस्थळ पाहण्यासाठी झुंबड उडाल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. संचालनालयाच्या आयटी कक्षामार्फत रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
प्रवेशासाठी सोमवारपासून नोंदणी
सीईटीचा निकाल जाहीर झाल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दि. ५ जूनपर्यंत आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी दि. १७ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच याच कालावधीत तंत्रशिक्षण संचालनालयाने दिलेल्या सुविधा केंद्रांवर कागदपत्रांची तपासणी करता येणार आहे. त्यानुसार दि. १९ जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. त्यावर दि. २० व २१ जून रोजी हरकती मागविल्या जातील. याचा विचार करून दि. २२ मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.