सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मार्चपासून मिळणार
By admin | Published: December 19, 2014 02:42 AM2014-12-19T02:42:11+5:302014-12-19T02:42:11+5:30
मागील तीन वर्षांपासून सूक्ष्म सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी कबुली देत ते अनुदान पुढील मार्च महिन्यापासून देण्यात येईल, अ
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सूक्ष्म सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही, अशी कबुली देत ते अनुदान पुढील मार्च महिन्यापासून देण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
भाजपाचे सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर जयप्रकाश मुंधडा, जयदत्त क्षीरसागर, हरिभाऊ जावळे यांनीही उपप्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना खडसे यांनी सांगितले की, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम २०१३-१४ पर्यंत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान म्हणून राबविण्यात येत होते. आता सन २०१४-१५ पासून केंद्र शासनाने राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाचा समावेश राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत ‘शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियान’ म्हणून केला आहे. केंद्र शासनाने केंद्राच्या हिश्श्यापोटी शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानासाठी १७७.५० कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर केला असून ६२.५० कोटी रुपये इतका निधी वितरित केला आहे. सदर निधी कृषी आयुक्तालयाकडून जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. केंद्र हिश्श्याच्या प्रमाणात राज्य हिश्शाचा निधी १५.६३ कोटी जिल्हा स्तरावर उपलब्ध आहे.
सन २०१४-१५ पासून शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानांतर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते व अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ३५ टक्के अनुदान देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे अनुदान ९० टक्के देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्याबाबत निर्णय व्हायचा आहे, मात्र अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना मात्र ९० टक्के अनुदान देण्यात येत असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)