राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक!
By admin | Published: July 2, 2015 12:37 AM2015-07-02T00:37:46+5:302015-07-02T00:37:46+5:30
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल
लोणावळा : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांची दररोज बाहेर येत असलेली नवनवीन प्रकरणे आणि त्यांचा वेग पाहता महाराष्ट्रात केव्हाही मध्यावधी निवडणूक लागेल, अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी वर्तविली.
खंडाळा येथील आंबेकर स्मृती येथे बुधवारी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपाने मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणाची घोषणा केली होती. सत्तेवर येताच एलबीटी रद्द करू असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोठेही अंमलबजावणी नाही़ भाजपाची ही आश्वासने म्हणजे केवळ अफवांचा पाऊस आहे.
सर्वसामान्य जनतेची जाण नसलेले असंवेदनशील शासन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी ९ व १० जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे़ पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण या विरोधात सभागृहाच्या आत व बाहेर आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.
बैठकीला राज्याचे महासचिव मोहन प्रकाश, प्रभारी स्वराज वाल्मिक, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत, प्रदेश महिलाध्यक्षा कमल व्यवहारे व इतर मान्यवर उपस्थित होते़
प्रभारी नियुक्त करणार
महाराष्ट्रात आगामी काळात २८८ मतदारसंघांत प्रभारी नियुक्त करणार आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेला घोटाळा व भ्रष्टाचार यामुळे बीडची चिक्की १०० वर्षांची परंपरा असलेल्या लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा जास्त प्रसिद्ध झाली आहे़ शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला घरचा आहे दिला आहे़ त्यामुळे ‘सावंत, आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असे म्हणावे लागेल, असे चव्हाण म्हणाले.
भारताचा अपमान
भारतात जन्मल्याची लाज वाटते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशामध्ये सांगून भारताच्या गौरवशाली परंपरेचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश यांनी केली़
रमजान ईदला भरती
१९ जुलैला रमजान ईदची सुटी असताना, त्याच दिवशी सरकारने राज्यात महसूल विभागातील क्लार्क भरतीची परीक्षा ठेवली आहे़ हे जाणीवपुर्वक असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़