राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?; ठाकरे गटाच्या दाव्यावर शरद पवारांचं वेगळंच मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:50 PM2022-11-24T14:50:14+5:302022-11-24T14:50:58+5:30
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल आणि भाजपावर निशाणा साधला.
मुंबई - राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य सुप्रीम कोर्टातील निकालावर अवलंबून आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार टिकणार की जाणार हे स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याची विधानं समोर येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे.
पत्रकार परिषद शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्थिरतेबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सरकार पडेल की नाही हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. माझा त्यावर विश्वास नाही. हात दाखवायला मी कुठेही जात नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. आसाममध्ये काय घडलं? हे देशाला माहिती आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, विज्ञानाचा पुरस्कार करणं आहे. परंतु मध्यावधीचं भाष्य मी कधी केले नाही. मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे सांगण्याच्या मी स्थितीत नाही असं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विधानावर भाष्य केले.
राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या
अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधानं करणं हा राज्यपालांचा लौकीक आहे. समाजात वाद निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे का असा प्रश्न निर्माण होतो. या पदावर जबाबदारीने भूमिका घ्यायची असते. राज्यपाल ही घटनात्मक पद आहे त्यामुळे त्यावर जास्त बोलले नाही. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल त्यांनी जे विधान केले. त्यामुळे त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. राज्यपालांबाबत योग्य तो निर्णय राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी घेतला पाहिजे असंही पवारांनी मागणी केली.
...तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर चर्चा करू
जी काही विधान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केलाय. आम्ही बेळगाव, कारवार, निपाणी मागतोय. बेळगाव, कारवार निपाणी, भालकी ही मागणी महाराष्ट्राची आहे. काही गावे कर्नाटकला हवीत तर त्यावर चर्चा होऊ शकते. परंतु त्याआधी बेळगाव, कारवार, निपाणी सोडायला हवं. काहीच न करता मागणी करणं त्याला आमचा विरोध आहे. भाजपाच्या पाठिंब्याचं राज्य तिथे आहे. कसंही वागा, काहीही मागण्या करा असा आत्मविश्वास वाढलाय. भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही असं सांगत शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"