पश्चिम विदर्भामधील एमआयडीसीत दलालांचेच भूखंड अधिक
By admin | Published: September 23, 2015 01:12 AM2015-09-23T01:12:33+5:302015-09-23T01:12:33+5:30
पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत
यवतमाळ : पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशाऱ्यावर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत असल्याने ते म्हणतील त्यालाच एमआयडीसीत प्लॉट मिळत आहेत. सध्या दलालांच्या आडोशाने बहुतांश बीअरबार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी हे प्लॉट हडपले आहेत.
एमआयडीसीत उद्योग सुरू न केलेले भूखंड परत घेण्याची भाषा केली जात असताना आजही अनेकांजवळ आठ ते दहा वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड पडून आहेत. फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या गाड्या, खताचे कारखाने यासाठी ते भाड्याने दिलेले आहेत.
दलालांनी यवतमाळ, अमरावती व मुंबईच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना
‘मॅनेज’ केले आहे. प्रती एकर जमिनीमागे अधिकाऱ्यांची तीन लाख रुपयांचे ‘मार्जिन’ असल्याचे खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
एकट्या यवतमाळ एमआयडीसीत वर्धेतील कुकरेजा आणि अकोल्यातील वीरवाणी
नामक दलालांची चालती
आहे. यवतमाळातील शंभरावर
भूखंड वेगवेगळ्या नावाने
वीरवाणीच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते.
यवतमाळमध्ये एका नामांकित हॉटेलचा मालक, दारूचा होलसेलर, मिल मालक, हार्डवेअर, ग्लास व किराणा व्यावसायिक तसेच वणीतील हॉटेलमालक आदींनी भूखंड घेतले आहेत.
एका दारूच्या होलसेलरने तर थेट मुंबईतून अडीच एकरांचा भूखंड मिळविला. अनेकांनी दालमिल, जिनिंग प्रेसिंग, आॅइल मिल थाटणार असल्याचे सांगून भूखंड घेतले. यवतमाळचे क्षेत्र अधिकारी, अमरावतीमधील प्रादेशिक अधिकारी, ट्रेसर, लिपिक, दलाल, मुंबईतील डेप्युटी सीईओ अशा साखळीतून मर्जीतील व्यक्तींना एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांचे सोयीने वाटप केले जाते.
१५ रुपये चौरस फूट दर असलेल्या भूखंडासाठी केवळ मार्जीन म्हणून सात रुपये प्रती चौरस फूट अतिरिक्त दर आकारला जातो. मात्र आकारलेल्या दरांबाबतचे कुठेही रेकॉर्ड ठेवले जात नाही.
(प्रतिनिधी)