मध्यावधीच्या चर्चेचे ढोलताशे!

By admin | Published: June 16, 2017 04:36 AM2017-06-16T04:36:12+5:302017-06-16T04:36:12+5:30

शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र

Middle-aged debate! | मध्यावधीच्या चर्चेचे ढोलताशे!

मध्यावधीच्या चर्चेचे ढोलताशे!

Next

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांचा संप सुरू असताना काही जण माझे सरकार खाली खेचण्याची भाषा करीत होते. मध्यावधी निवडणुकीची आमचीही तयारी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेसह विरोधी पक्षांसमोर राजकीय गुगली टाकली. तर कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असेल, तर राज्यात भूकंप घडवून आणू. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे दिला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शिवसेनेची धमकी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आजच्या सूचक विधानामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे ढोलताशे वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मध्यंतरी मध्यावधीचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोणी आमच्यावर मध्यावधी निवडणूक लादूच पाहत असेल तर त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. उद्या मध्यावधी झालीच तर भाजपाचेच सरकार येईल. राज्यातील जनतेचा माझ्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मध्यंतरी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशाने ते सिद्धच केले आहे. उद्या निवडणूक झाली तर राज्यातील अलिकडच्या घडामोडींचा भाजपाच्या यशावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात मध्यावधी होणार असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले नाही. मात्र, उद्या तशी परिस्थिती आलीच तर आमची तयारी आहे एवढेच त्यांनी म्हटले आहे. पक्ष म्हणून निवडणुकीची तयारी नेहमीच ठेवावी लागते, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज निवडून येईल.
या निवडणुकीत पाठिंब्याच्या बदल्यात आम्हाला कोणी ‘ब्लॅकमेल’ करू शकत नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला. एनडीएकडे ५४ टक्के मते आजच आहेत आणि अन्य काही पक्षांनी सहकार्याची तयारी दर्शविली असल्याने हा टक्का ६४ पर्यंत जाईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

अमित शहांच्या दौऱ्यात मध्यावधीची चाचपणी!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे १६ जूनपासून तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची चाचपणी करणार असून या संदर्भात ते मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार व पक्ष पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेऊ शकतात, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सरकार पडू देणार नाही, पण...
शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्षे हे सरकार आम्ही पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

- नोटाबंदीच्या पापाची परतफेड म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली. मात्र, तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

काँग्रेसही तयार... सत्ताधाऱ्यांना मध्यावधीची घाई झाली असेल, तर काँग्रेसही तयार असून एकदाचा निर्णय घेऊन टाका, असे आव्हान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दिले.

Web Title: Middle-aged debate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.