मुजोर रिक्षांविरोधात प्रवासी एकवटले
By admin | Published: July 10, 2017 03:45 AM2017-07-10T03:45:10+5:302017-07-10T03:45:10+5:30
वाहतूक विभाग आणि पोलीस अपयशी ठरल्याने-त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्या यंत्रणांवरील प्रवाशांचा विश्वास उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रिक्षा प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यात राजकीय पक्ष, वाहतूक विभाग आणि पोलीस अपयशी ठरल्याने-त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्या यंत्रणांवरील प्रवाशांचा विश्वास उडाला आहे. डोंबिवलीचा स्टेशन परिसर बेकायदा रिक्षा स्टॅण्डनी व्यापला आहे, तरीही रिक्षा मिळत नाही. मुजोर रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे नेत्यावर अवलंबून न राहता रिक्षा प्रवासी संघटना स्थापन करून प्रवाशांचा दबावगट तयार करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या प्रवाशांच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटत नसल्याने त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेण्याचेही या वेळी ठरले.
रिक्षाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी, प्रसंगी अडचणीतील प्रवाशाला मदत करण्यासाठी ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट रिक्षावाले’ हा व्हॉटस्अॅप ग्रूप स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे ही बैठक झाली. मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी आणि प्रवाशांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी प्रवाशांचा दबाव गट तयार करण्यासाठी ३ जुलैला सुरु झालेल्या या ग्रूपवर २५० पेक्षा जास्त प्रवासी आहेत. हा ग्रूप जागरुक नागरिक वंदना सोनावणे, सचिन गवळी, सचिन कटके आणि ओम लोके यांनी तयार केला आहे. त्यांनी बोलावलेली बैठक सुरु असताना परिवहन समिती सभापती संजय पावशे व मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे तेथे आले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवलीतही एक शहर एक रिक्षा स्टॅण्ड ही संकल्पना का राबविली जात नाही, असा प्रश्न विचारला. डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्यात जागा मोकळी आहे. पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाणे स्थलांतरित झाले आहे. त्या जागेवर रिक्षा स्टॅण्ड सुरु करण्याचा पर्याय सुचवला. खंबाळपाडा बस डेपोचे उद््घाटन भाजपा सदस्य शिवाजी शेलार यांच्या निधनामुळे तेव्हा झाले नव्हते. पण सहा महिने उलटून गेले तरी अद्याप डेपो सुरु का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
शहाजी एखंडे म्हणाले, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने पीएनटी कॉलनीत बस सुरु केली होती. ती का बंद केली? दिगंबर यांनी स्टेशन परिसरात रिक्षाच्या तीन रांगा लागतात. पण प्रवाशांना एकही रिक्षा उपलब्ध होत नाही, याकडे लक्ष वेधताच या बैठकीला आरटीओ, परिवहन समिती, वाहतूक पोलिस आणि रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावण्याचा मुद्दा पुढे आला. पण ग्रूपच्या सदस्या सोनावणे यांनी या यंत्रणावरील प्रवाशांचा विश्वास उडाला आहे. त्याना बोलवून काय करणार? असा प्रश्न केला. सोनावणे यांनी सांगितले, मेहेंदळे आजींचे हाड वाहतूक कोंडीत सापडून मोडले. त्या समोर आल्याने हा प्रकार कळाला. अशा अनेक घटना असतील. त्या समोर यायला हव्या. नीलेश काळे यांनी या बैठकीला लोकप्रतिनिधींना बोलावण्यास विरोध केला. प्रवाशांनीच राजकीय व प्रशासनावर दबाव आणणारा गट तयार करावा, अशी सूचना केली. संदीप मोरे यांनी केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष कृती हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजन मुकादम यांनी पी वन आणि पी टू ही पार्किंग पद्धती बंद करुन तात्पुरत्या पार्किंगचा पर्याय सुचवला. पुष्कर पुराणिक यांनी प्रवाशांनी पुढे येत लढा यशस्वी करण्याची भूमिका मांडली.
विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रवाशांकडून फिडबॅक फॉर्म भरुन घेण्याचा मुद्दा मांडला. स्टेशन परिसरात हजारो रिक्षा प्रवाशांकडून तो भरुन घ्यावा, प्रश्न-तक्रारींनुसार त्याचे वर्गीकरण करावे. त्या आधारे मागण्याची फ्रेम तयार करावी, त्या आधारे पाठपुरावा करावा, असे सुचवले.
डोंबिवलीत २० मार्गांवर बस
सभापती पावशे यांनी डोंबिवलीत जवळपास २० मार्गांवर बस सुरु करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. खंबाळपाडा बस डेपो तीन महिन्यात सुरु करण्यात येईल, असे ते म्हणाले. डोंबिवली स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. त्या जागेचा वापर बस सुरु करण्यासाठी करावा, अशी मागणी प्रवाशांनी त्यांच्याकडे केली.
‘रिक्षा स्टॅण्ड चौक’ म्हणा!
इंदिरा गांधी चौकात १० रिक्षा स्टॅण्ड आहेत. ते दूर केल्याशिवाय स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर होऊ शकत नाही. प्रशासनाला ताळ््यावर आणण्यासाठी इंदिरा गांधी चौकाला ‘रिक्षा स्टॅण्ड चौक’ असे प्रतिकात्मक नाव देण्याची उपहासात्मक सूचना ग्रूपच्या सदस्यांनी केली.