कचरा डेपो स्थलांतरित करा
By admin | Published: September 24, 2016 01:08 AM2016-09-24T01:08:02+5:302016-09-24T01:08:02+5:30
कचरा आसपास पसरून त्याच्या दुर्गंधीने आसपासच्या बंधनगड, चेरीबेरी, हरिओम पुरम्, सँडलवूड, अमेय आदी सोसायट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला
औंध : सर्व्हे नं. २४४/१ मध्ये नवीन डीपी रोडवरील देवीच्या मंदिरासमोर असलेल्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नसल्याने हा कचरा आसपास पसरून त्याच्या दुर्गंधीने आसपासच्या बंधनगड, चेरीबेरी, हरिओम पुरम्, सँडलवूड, अमेय आदी सोसायट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या कचरा डेपोच्या पुढेच काही फुटांवरच खासगी प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र असल्यामुळे यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या दोन्ही गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा कचरा डेपो येथून तातडीने हलवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्वच्छ या कचरा-सेवक स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी वस्त्यांमधून कचरा गोळा करून या ठिकाणी गोळा करतात. नंतर हा कचरा कंटेनरच्या साह्याने डम्पिंग यार्डमध्ये पाठविला जातो; मात्र हे वर्गीकरण रोज वेळच्या वेळी होत नसल्यामुळे हा कचरा रस्त्यावर पसरलेला दिसतो. दुसरी बाब म्हणजे, या कचरा डेपोच्या पुढेच काही फुटांवर खासगी प्लॅस्टिक संकलन केंद्र असून त्या केंद्रातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिकच्या वस्तू भरलेली पोती रस्त्याच्या शेजारीच लावून ठेवलेली दिसतात. त्यामुळे हा संपूर्ण परिसर कचरामय झाल्याचे वाईट चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)
>कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना घरात राहणे कठीण झाले आहे. रस्त्यावरून ये-जा करताना नाक दाबल्याशिवाय प्रवास करता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. कचऱ्यामुळे घराघरांत माश्या, डास वाढले आहेत.