मिखाईललाही ठार मारायचे होते, पण...
By admin | Published: September 1, 2015 02:31 AM2015-09-01T02:31:00+5:302015-09-01T02:31:00+5:30
शीना बोराला विक्रोळीजवळ कारमध्ये ठार मारल्यानंतर आम्ही त्याच कारमधून मिखाईलला आणून ठार मारण्यासाठी पुन्हा वरळीला निघालो होतो, अशी माहिती संजीव खन्ना याने
डिप्पी वांकाणी, मुंबई
शीना बोराला विक्रोळीजवळ कारमध्ये ठार मारल्यानंतर आम्ही त्याच कारमधून मिखाईलला आणून ठार मारण्यासाठी पुन्हा वरळीला निघालो होतो, अशी माहिती संजीव खन्ना याने पोलिसांना दिली. मिखाईलला त्यांनी शीतपेयातून नशेचे पदार्थ दिले होते. पण परत आले तेव्हा मिखाईल तेथे त्यांना दिसला नाही; तेव्हा त्यांना धक्का बसला होता.
डेहराडूनमध्ये शीनाचा राहुलशी साखरपुडा झाला तेव्हापासून इंद्राणीने तिला ठार मारण्याची योजना आखायला सुरवात केली होती. कारण पीटर मुखर्जीचा राहुल हा कायदेशीर वारस होता व त्यामुळे शीना अधिक वरचढ बनली असती व ही बाब शीनाचा द्वेष करणाऱ्या इंद्राणीला सहन झाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. इंद्राणी व संजीव खन्ना यांनी शीना आणि मिखाईल यांना त्याच रात्री एकामागोमाग एक असे ठार मारायचे ठरविले होते. यासाठी त्यांनी दोन सुटकेसेसही विकत आणल्या होत्या. वरळीच्या घरी त्यांनी मिखाईलला अमलीपदार्थ खाऊ घातले होते. शीनाला ठार मारल्यानंतर ते मिखाईलला घेऊन येण्यासाठी त्याच मार्गाने परत आले होते. त्यालाही ते गळा दाबून ठार मारणार होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर मिखाईलने नोकरी सोडली होती आणि तो इंद्राणीकडे दरमहा खूप पैसे मागू लागला होता. त्यामुळे त्यालाही ठार मारण्यात येणार होते. राहुल आणि शीना यांच्या संबंधांना पीटर व इंद्राणी यांची मान्यता नव्हती तरीही त्या दोघांनी साखरपुडा केला. मात्र या समारंभाला पीटर व इंद्राणी दोघेही उपस्थित नव्हते.
पीटरला राहुल आणि रॉबिन ही दोन मुले असल्यामुळे त्याच्या मालमत्तेचे ते कायदेशीर वारस होते. शीनाचा कमालीचा द्वेष करणाऱ्या इंद्राणीला राहुलच्या माध्यमातून का असेना पीटरच्या मालमत्तेमध्ये वाटेकरी होणार, हे सहन झाले नाही. त्याच सुमारास मिखाईलही इंद्राणीला मी तुझा भाऊ आहे मुलगा नाही, हे रहस्य उघड न करण्यासाठी सतत भरपूर पैसे मागायचा. मिखाईल विमान कंपनीत नोकरीस होता ती त्याने सोडून दिली होती. त्यानंतर तो इंद्राणीवर अवलंबून राहिला. या कारणांमुळेच तो इंद्राणीच्या हिटलिस्टवर आला होता, असे या सूत्रांनी सांगितले.
पीटर मुखर्जीकडे ब्रिटिश पासपोर्ट होता व तो भारतात केवळ भेट देण्यास यायचा, असे पोलिसांनी सांगितले. पीटर व इंद्राणी हे जोडपे त्यांचा बहुतेक काळ लंडनमध्ये घालवायचे. इंद्राणीने ठार मारण्यासाठी अडीच लाख रुपये देऊन एकाला सुपारी दिली होती. परंतु ते काम तो करू शकला नाही. मात्र या प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा पोलिसांनी इन्कार केला. आम्ही आतापर्यंत केलेली चौकशी कोणत्याही मारेकऱ्यापर्यंत गेलेली नाही, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.