सातारा आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साडवली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:06 PM2021-05-23T13:06:46+5:302021-05-23T13:07:49+5:30
हा धक्का विशेष करून इमारतीत उंच ठिकाणी राहणार्या नागरिकांना अधिक जाणवला. याशिवाय, साताऱ्यातही आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला.
रत्नागिरी/सातारा - गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर असतानाच रविवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का विशेष करून इमारतीत उंच ठिकाणी राहणार्या नागरिकांना अधिक जाणवला. याशिवाय, साताऱ्यातही आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. (Mild earthquake in Devrukh, Sadavali area and Satara district)
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातावरणात काहीसा बदल झाला आहे. वादळानंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर आहे. तर काही वेळा कडकडीत ऊन पडत आहे. मात्र, रविवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील काही भागात भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून गेले होते. पण, सौम्य धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
काही घरांत भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भांड्यांच्या आवाजाने नागरिकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली. तर काहीजण झोपेत असताना बेड हल्ल्याने भीतीने जागे झाले. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरिकांना जाणवला.
सातार्यातही भूकंपाचा धक्का -
सातारा येथे आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. या भुकंपाचे केंद्र सातार्यात जमिनीखाली ५ किमी खोल होते. भुकंपाचे केंद्रबिंदू मुंबईपासून २१६ किमी दूर आहे. १७.३६ आणि ७३.८४ रेखांश आणि अक्षांशावर याचा केंद्रबिंदू होता.
पाटण परिसरात तीन रिस्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का -
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि कोयना धरण परिसरातही रविवारी सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी तीन रिस्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे स्वरूप सौम्य असल्याची माहिती कोयनानगर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.
कोयना धरण परिसरात गेल्या महिन्यातच भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. त्यातील दोन धक्के एका दिवशी लागोपाठ बसले होते. त्यापाठोपाठ रविवारीही हादरा बसला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र कोयना धरणाला कसलाही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.