मिलिंद नार्वेकरांनी दिली शिवसेनेत येण्याची आॅफर, निलेश राणे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:06 PM2017-09-20T21:06:36+5:302017-09-20T21:23:39+5:30
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला.
रत्नागिरी, दि. 20 : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेयांनी आज रत्नागिरीमध्ये केला. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा बॉम्ब टाकला. नारायण राणे यांना अशोक चव्हाण यांचे नेतृत्त्व मान्य नाही आणि ते फक्त सोनिया गांधी यांचेच आदेश मानतात, असेही राणे यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याखेरीज दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा नीलेश राणे यांनी कुडाळ येथील सभेत केली. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार राऊत यांनी शिवसेना निलेश राणे यांचा अडीच लाख मतांनी पराभव करेल, असे उद्गार काढले. त्याला उत्तर देताना राणे यांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. विनायक राऊत यांना उमेदवारी मिळेल की नाही, याचीच शंका आहे, त्यांनी मतांचे आकडे सांगू नयेत, असे राणे म्हणाले.
नारायण राणे यांना शिवसेनेने आॅफर दिलेली नाही, असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. त्याला उत्तर देताना नीलेश राणे म्हणाले की, मिलींद नार्वेकर यांनी राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर दिली होती. पुढच्या गोष्टी काय झाल्या ते शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असे त्यांनी सांगितले.