मिलिंद पाटणकर भाजपाचे गटनेते
By admin | Published: February 28, 2017 03:12 AM2017-02-28T03:12:09+5:302017-02-28T03:12:09+5:30
भाजपाचे वादग्रस्त राहिलेले आणि ज्यांच्यावर पक्षातीलच काही नगरसेवकांनी अविश्वास दाखवला होता
ठाणे : भाजपाचे वादग्रस्त राहिलेले आणि ज्यांच्यावर पक्षातीलच काही नगरसेवकांनी अविश्वास दाखवला होता, ते ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यावर आता वरिष्ठांनीच विश्वास दाखवला आहे. त्यांच्या गळ्यात भाजपाच्या गटनेतेपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भातील पत्रदेखील भाजपाच्या गटाने सोमवारी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. त्यानुसार, आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले.
या निवडणुकीत भाजपाला २३ जागा मिळाल्या असून पाटणकर यांनी आपल्या प्रभागातील अख्खे पॅनल निवडून आणले आहे. २०१२ नंतर ठाणे परिवहन सेवेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळेस घडलेल्या राजकीय नाट्याचे ते बळी ठरले होते. या वेळेस युती उमेदवारांच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले होते. त्यानंतर, त्यांना स्वपक्षातील नगरसेवकांनी आणलेल्या दबावाला बळी पडून उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवस ते भूमिगतही झाले होते. पक्षातील एका गटाकडून अविश्वास आणून त्यांना शहराध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागले होते. एवढे घडून गेल्यानंतर आता श्रेष्ठींनीच त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. (प्रतिनिधी)