मिलिंद देवरांना खंडणीसाठी धमकी!
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:42+5:302014-06-05T23:00:24+5:30
माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे.
रास्थानच्या पत्त्यावरून आले पत्र
पोलिसांना वाटतो चेष्ठेचा विषय, चौकशी सुरू
मुंबई। दि. ०५ (प्रतिनिधी) माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांचे एक पथक अधिक चौकशीसाठी राजस्थानला रवाना झाले आहे.
२७ मे रोजी खेतान भवन या देवरांच्या जनसंपर्क कार्यालयात हे पत्र धडकले. त्यात २५ कोटी दिलेल्या पत्त्यावर पाठव, नाही तर मला तिथे(मुंबईत) यावे लागेल, पैसे दिले नाहीस तर परिणाम वाईट होतील, असा मजकूर हिंदीत लिहिलेला होता. पत्रावर देवरांचे नाव आणि मुंबई, महाराष्ट्र इतकाच पत्ता होता. त्यावर पाठवणार्याचे नाव आणि पत्ता रीपुदमन सिंग थटेरा, बिकानेर, राजस्थान असा लिहिण्यात आला होता.पत्र मिळताच देवरा यांचे सचिव एल. के. संजीव यांनी तात्काळ ते मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात सादर केले आणि चौकशीची मागणी केली.
धमकीच्या पत्रावर पाठवणार्याचे नाव, पत्ता असल्याने पोलीस संभ्रमीत झाले आहेत. बहुधा हे पत्र माथेफिरूने देवरांची चेष्ठा करण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीचे नाव पत्रात आहे त्याच्या मागे ससेमिरा लावण्यासाठी धाडले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
सध्या या पत्राबाबत चौकशी सुरू आहे. सखोल चौेकशीअंती गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अप्पर आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी लोकमतला सांगितले. मरिनड्राईव्ह पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.