महाडमध्ये सैनिकाची आत्महत्या
By admin | Published: October 15, 2016 04:13 AM2016-10-15T04:13:58+5:302016-10-15T04:13:58+5:30
भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत:च्या छातीत बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली
महाड : भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत:च्या छातीत बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. महाड शहरातील कवे आळी परिसरात श्रेयस कॉम्प्लेक्स इमारतीतील एका फ्लॅटमध्ये या सैनिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
राजेश पिलावरे (३२, मूळ रा. पडवी, ता. महाड) असे या मृत पावलेल्या सैनिकाचे नाव असून, तो पंजाब येथे सेवेत होता. १० आॅक्टोबरपासून राजेश पिलावरे हा रजेवर आला होता. दसऱ्यानिमित्त त्याची पत्नी दोन मुलींसह आमशेत येथे माहेरी गेली होती. त्यामुळे राजेश हा महाडमधील फ्लॅटमध्ये एकटाच होता. त्याच्या मुलीची परीक्षा असल्याने शुक्रवारी सकाळी पत्नी, दोन मुलींसह माहेरून महाड येथे परतली. त्या वेळी फ्लॅटचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी आपल्या भावाला कळवले. भाऊ आल्यानंतरही आतून दरवाजा उघडत नसल्याने त्याने याबाबत शहर पोलिसांना कळवले. बंद फ्लॅटचा दरवाजा फोडल्यानंतर फ्लॅटच्या हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात राजेशचा मृतदेह आढळला. कौटुंबिक वादातून ही आत्महत्येची घटना घडल्याचे बोलले जात असून, शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पिलावरे कुटुंबीय चार महिन्यांपूर्वीच अंबरनाथ येथून महाड शहरात राहण्यास आले होते. (वार्ताहर)