‘दामिनीं’चा लष्करी वचक
By admin | Published: March 9, 2016 12:56 AM2016-03-09T00:56:03+5:302016-03-09T00:56:03+5:30
शहरात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी मुली-महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला बीट मार्शल्सला जागतिक महिला दिनी ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे
पुणे : शहरात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी मुली-महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला बीट मार्शल्सला जागतिक महिला दिनी ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे. तसेच या ‘दामिनीं’ आता शहरात लष्करी गणवेषात फिरून गुन्हेगारांवर वचक बसविणार आहेत.शहरात जुलै २०१५ पासून महिला बीट मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे. ३३ बीट मार्शल असून त्यांना फिरण्यासाठी १७ दुचाकी वाहने मागील सहा महिन्यांत या मार्शल्सकडून अनेक प्रकरणे समोर आणून ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. बलात्कार, हाणामारी, चोरी, मुलींची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये या मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री ९ अशा दोन शिफ्टमध्ये या मार्शल काम करतात. मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या महिला बीट मार्शल्सला मंगळवारपासून ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे. ‘दामिनी बीट मार्शल्स’ म्हणून त्यांंना यापुढे ओळखले जाईल. तसेच शहरात फिरत असताना त्यांचे वेगळेपण जाणवावे म्हणून त्यांना लष्करी गणवेश देण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयामध्ये पाठक यांच्या हस्ते महिला बीट मार्शल्सचा विशेष सत्कार करण्यात आला. महिला मार्शल्सच्या कामगिरीबद्दल मंगळवारी पाठक यांनी त्यांचा सत्कार केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.