लष्करी सराव हे देशाचे भाग्य
By admin | Published: March 3, 2016 01:34 AM2016-03-03T01:34:30+5:302016-03-03T01:34:30+5:30
भारतात होत असलेला आंतरराष्ट्रीय लष्करी सराव भारतात होणे ही देशासाठी मानाची गोष्ट असून, भारतीय लष्करावर सहभागी देशांनी टाकलेला विश्वास ही देशासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे
पुणे : भारतात होत असलेला आंतरराष्ट्रीय लष्करी सराव भारतात होणे ही देशासाठी मानाची गोष्ट असून, भारतीय लष्करावर सहभागी देशांनी टाकलेला विश्वास ही देशासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे. तसेच, येत्या काळात भारत जगाचे नेतृत्व करेल, अशी आशा दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली. बुधवारी झालेल्या ‘एक्झरसाईज फोर्स १८’ या सरावाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
रावत म्हणाले, ‘‘अशा प्रकारे आशियायी देशांचे नेतृत्व करायला मिळणे ही देशासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे देशाचे इतर देशांबरोबर असणारे संबंध सुधारण्यास मदत होईल़ त्याबरोबरच भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण व्हायला मदत होणार आहे. आशियायी देशांमध्ये शांतता राखण्यासाठी निश्चितच उपयुक्त होईल.’’
युद्धादरम्यान वापरल्या जाणाऱ्या भूसुरुंगांचा शोध घेऊन ते नष्ट करणे तसेच शांतता मोहिमेदरम्यानच्या कारवायांचा सराव करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. देशात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाविषयीही यामध्ये धडे देण्यात येणार आहेत. भूसुरुंगांमुळे देशातील जमिनीचा भाग मोठ्या प्रमाणात निकामी होतो; त्यामुळे ती जमीन वापरणे
अशक्य होते. तसेच, यामुळे
लहान मुले, महिला तसेच नागरिकांच्या दृष्टीनेही हे धोक्याचे आहे. त्यादृष्टीने हा सराव अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये १६ देशातील ३००हून अधिक जवान सहभागी झाले आहेत. या मोहिमेतील प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अमेरिका, कोरिया, जपान, चीन, न्यूझीलंड, सिंगापूर यांसह एकूण १६ देशांचा एकत्रित लष्करी सराव पुण्यातील औंध लष्करी तळ येथे सुरू झाला. २ ते ८ मार्चदरम्यान हा सराव चालणार असून भारतासह कोरिया, व्हिएतनाम आदी सहभागी जवानांना प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये एकूण १८ देश सहभागी होणार होते; मात्र काही कारणांमुळे म्यानमार व कंबोडिया या देशांनी या प्रशिक्षणातून माघार घेतली आहे.
उद्घाटनप्रसंगी दक्षिण मुख्यालयातर्फे विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. यामध्ये बँड, नयनमनोहारी सांघिक प्रात्यक्षिके, कुकरी डान्स अणि केरळमधील कलेरी पायटू यांचे सादरीकरण झाले.
(प्रतिानिधी)आंतरराष्ट्रीय सरावाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी ही महिला करत आहे. इतक्या मोठ्या कार्यक्रमात देशाचे नेतृत्व करणारी ती पहिली महिला अधिकारी आहे. याबाबत लेफ्टनंट जनरल बिपीन रावत म्हणाले, ‘‘भारतीय लष्करात महिला आणि पुरुष असा भेदभाव नसतो़ त्यामुळे महिला असली, तरीही लष्करासाठी ती एक देशसेवकच आहे.’’ तर, स्वत: कुरेशी म्हणाल्या, ‘‘मी अशाप्रकारे नेतृत्व करत असल्याचा मला अभिमान आहे.’’ जास्तीत जास्त महिलांनी लष्करात यावे, असे आवाहनही कुरेशी यांनी केले.भारत आणि रशिया यांचे एकमेकांशी जुने संबंध असून अनेक बाबतींत हे दोन देश एकमेकांच्या सोबत काम करीत आहेत. भारतात अशा प्रकारच्या सरावासाठी सहभागी व्हायला मिळणे ही आमच्यासाठी एक संधी असल्याचे मत सरावात सहभागी झालेल्या रशियाच्या जवानांनी व्यक्त केले. तर, आमच्या देशात काही घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे दक्षिण कोरीयाचे जवान सोंग म्हणाले. महात्मा गांधी हे माझे आदर्श असून भारतीय योगाबाबतही मला विशेष कौतुक आहे, असे त्यांनी सांगितले़