सैन्य भरती घोटाळा; कारवाईसाठी घेणार विधिज्ञांचा सल्ला

By admin | Published: March 16, 2017 03:58 AM2017-03-16T03:58:49+5:302017-03-16T03:58:49+5:30

सैन्य भरती घोटाळ्यामध्ये अडकलेल्या ३५० विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत ठाणे पोलीस विधिज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे

Military recruitment scandal; Legal advisor to take action | सैन्य भरती घोटाळा; कारवाईसाठी घेणार विधिज्ञांचा सल्ला

सैन्य भरती घोटाळा; कारवाईसाठी घेणार विधिज्ञांचा सल्ला

Next

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यामध्ये अडकलेल्या ३५० विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत ठाणे पोलीस विधिज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. विधिज्ञ या प्रकरणी काय सल्ला देतात, यावरच या विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
२६ फेब्रुवारी रोजी ४ पदांसाठी सैन्य भरती मंडळातर्फे देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तत्पूर्वी, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ठाणे पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात धाडी टाकून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये एकूण ३५० विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा आरोपींनी फोडलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव हे विद्यार्थी करीत होते. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना सोडले आहे. परंतु, आता या प्रकरणाचा तपास वेगात सुरू असताना त्या विद्यार्थ्यांचे काय करावे, असा पेच पोलिसांना पडला आहे.
प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात आरोपींनी विद्यार्थ्यांशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले नव्हते. त्यांची मूळ प्रमाणपत्रे मात्र आरोपींनी स्वत:च्या ताब्यात घेतली होती. अंतिम निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठरलेली रक्कम द्यायची आणि मूळ प्रमाणपत्रे आरोपींकडून परत घ्यायची, असा हा सौदा होता. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आरोपी करावे अथवा नाही, असा पेच पोलिसांसमोर पडला आहे. कायद्याच्या चौकटीतून विचार केला तर हे विद्यार्थी पीडित शब्दाच्या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर विधितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधिज्ञांनी विद्यार्थ्यांनाही आरोपी करण्याचे मत नोंदवल्यास पोलिसांसमोर पर्याय राहणार नाही. या प्रकरणातील बहुतांश विद्यार्थी आजीमाजी सैनिकांच्या कुटुंबातील आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच आहे. नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्याचे त्यांचे स्वप्न गत महिन्यातील भरतीवेळी पूर्ण होऊ शकले नाही. आता फौजदारी कारवाईचा
ससेमिरा मागे लागला, तर त्यांचे नोकरीचे स्वप्न कदाचित कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Military recruitment scandal; Legal advisor to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.